जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
By Admin | Published: February 18, 2015 01:31 AM2015-02-18T01:31:37+5:302015-02-18T01:32:06+5:30
जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या मंगळवारी सहावर पोहोचली आहे़ या संशयित रुग्णांच्या घशातील स्त्राव पुणे येथे पाठवावा लागतो; मात्र हे स्त्राव घेण्याचे काम डॉक्टरांऐवजी नर्सच करीत असल्याचे चित्र आहे़ त्यांना हे स्त्राव घेण्याचे काम सुव्यवस्थितपणे करता येत नसल्याने पुणे प्रयोगशाळेकडून नव्याने स्त्राव पाठविण्यास सांगितले जात असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात एकच कक्ष कार्यान्वित असल्याने नव्याने येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे कुठे? असा प्रश्नही निर्माण झाला आहे़
नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात द्वारकाबाई कहानू जुगरे (६०, शहापूर, ठाणे), प्रीती ओमप्रकाश श्रीवास्तव (३८, इगतपुरी), रेहान हाश्मी (३७, वडाळागाव, मेहबूबनगर), मोहिनी नितीन राकेश (२५, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी), लक्ष्मी खंडू शार्दुल (६२, उमराळे, दिंडोरी), शाहीद सिकंदर शेख (१८, सिन्नर) हे रुग्ण गुरुवार (दि़१२) पासून उपचार घेत आहेत़ जिल्ह्यात या रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तसेच पाच लोकांचा बळी गेला असताना जिल्हा रुग्णालयात केवळ एकच कक्ष सुरू करण्यात आला आहे़ या कक्षामध्ये फक्त सहाच रुग्ण ठेवता येतात़ स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा घशातील स्वॅब घेऊन तो पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो़ तेथील तपासणीनंतर संबंधित रुग्णाला स्वाइन फ्लू झाला आहे की नाही याबाबत अहवाल येतो़ जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांचा स्वॅब घेणे आवश्यक असताना हे काम नर्सेसकडून करून घेतले जाते़ नर्सेसकडून तो व्यवस्थितरीत्या घेतला जात नसल्याने पुणे येथून पुन्हा नमुने पाठविण्याबाबतही सांगण्यात आले आहे़ स्वाइन फ्लूने मृत्यू पावलेल्या महिलेचा स्वॅबही मागविण्यात आला होता़ मात्र, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तो कसा पाठविणार हे प्रश्नचिन्हच आहे़ या महिलेच्या नातेवाइकांचेही नमुने पुणे येथे पाठविण्यात आले; मात्र तेही पुन्हा नव्याने पाठविण्याबाबत सांगण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयातील संबंधित डॉक्टरांनीच रुग्णांचे स्वॅब घ्यावेत, अशी जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़एकनाथ माले यांनी निश्चित करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)