ओझरनजीक वाहतूक कोंडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 06:21 PM2019-07-23T18:21:16+5:302019-07-23T18:21:50+5:30
सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ओझर : सध्या मुंबई - आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून ड्यूटीवर असलेले पोलीस कर्मचारी त्यात आणखी भर टाकत तेथेच पावत्या फाडत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
महामार्गावर नाशिक ते ओझरदरम्यान काही वर्षांपूर्वी सहा पदरीकरण झाले होते. परंतु ओझर येथील खंडेराव मंदिर, गडाख कॉर्नर, लक्ष्मीनगर, जत्रा हॉटेल, हनुमाननगर, अमृतधाम येथे कायम होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनधारक त्रस्त होते. परिणामी लेट का होईना येथे कामं मंजूर झाली व तीन उड्डाणपुलांचा समावेश करण्यात आला.
वाहतुकीचे तीन तेरा
येथील तात्पुरती वाहतूक पोलीस चौकी मात्र दंड वसुलीचे ठिकाण बनल्याचे दिसून आल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. चांदवड, पिंपळगाव, ओझर, आडगाव येथून दररोज हजारो नागरिक, अनेक रुग्ण, नोकरदार, विद्यार्थी नाशिक शहरात ये-जा करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतो. सदर वाहतूक सुरळीत करण्याचे सोडून दंड वसुलीच्या नावाखालीच अनेक वेळा स्थानिक वाहतूक शाखेचे पोलीस झालेली कोंडी वाऱ्यावर सोडून देत असल्याने त्याचा फटका सामान्य माणसाला बसतोय. याबाबत स्थानिक नागरिकांनी तसेच नोकरदार, विद्यार्थिवर्गाने याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.सदर कामांना सुरुवात झाल्यानंतर येथे सकाळ सायंकाळ होत असलेली वाहतूक कोंडी वाहधारकांना डोकेदुखी ठरत असताना ती सुरळीत करण्यासाठी अमृतधाम, हनुमाननगर येथे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या समवेत हंगामी कर्मचारी वाहनांच्या रांगा सुरळीत करीत असताना पोलीस मात्र त्या कोंडीत भर घालत असल्याचे चित्र बघण्यास मिळत असून, एकेरी करण्यात आलेल्या रस्त्यावर अवजड वाहनदेखील मोठ्या प्रमाणावर ये - जा करत असताना समांतर रस्त्याचा उपायदेखील उपलब्ध असून, केवळ त्याचा सुरळीत अवलंब केला जात नाही. जिथे क्र ॉसिंग आहे तिथे चेहरा पाहून सर्वच प्रकारच्या वाहनांना अडविले जाते व जोपर्यंत देवाणघेवाण होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी झालेली असते.