ओझरखेड, तिसगाव जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 01:34 AM2019-08-04T01:34:14+5:302019-08-04T01:35:17+5:30
गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे.
वणी : गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तिसगाव धरणात पाणी आले आहे.
दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पर्जन्यराजाची कृपावृष्टी होत असून, नदी-नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. हे पाणी विविध मार्गांनी धरणात प्रवाहित होत आहे. पालखेड, पुणेगाव-करंजवन, वाघाड या धरणांत समाधानकारक जलसाठा आहे. त्यात सध्याच्या पावसामुळे अजून वाढ झाली आहे. ओझरखेड धरणालगतच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी होते, तर तिसगाव धरण गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक झाले होते; दोन दिवसांच्या पावसाने ओझरखेड धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे, तर खेडगाव परिसरातील पाराशरी नदी वाहू लागल्याने दोन महिन्यांनंतर तिसगाव धरणात जलदर्शन झाले आहे. या धरणातून खेडगाव येथे पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित आहे, तर शेतकरी यातील पाणी वापरास अग्रक्र म देतात.