कोरोनामुळे अकाली मृत्यूत वाढ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:10 AM2021-06-01T04:10:59+5:302021-06-01T04:10:59+5:30
नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते ...
नाशिक : वर्षभरापासून ठाण मांडून असलेल्या कोरोनाने हजारो नागरिकांचे बळी घेतले. यात लहान मुलांपासून ते घरातील कर्तेधर्ते व वृद्धांचाही समावेश असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. असे असले तरी, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, अशा कुटुंबीयांनाही भविष्याची चिंता लागून असल्याने अनेकांनी याकाळात मृत्यूपत्र करून घेतल्याचे समोर आले आहे.
मृत्यूपत्र करणाऱ्यांमध्ये विशेषकरून वृद्धत्वाकडे झुकलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आपल्या जाण्याने कुटुंबीयांचे, मुला-बाळांचे कसे होईल, या एकमेव चिंतेबरोबरच वडिलोपार्जित संपत्ती मातीमोल ठरू नये, या भावेनेतूनदेखील मृत्यूपत्र केले जात असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मृत्यूपत्र नोटरी व दुय्यम निबंधकांकडे नोंदणी पद्धतीने केले जाते. मात्र, त्यासाठी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तींची समक्ष उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
-----------
स्वकष्टीत मालमत्तेचेच होईल मृत्यूपत्र
मृत्यूपत्र तयार करतांना स्वकष्टाची वा वडिलांकडून स्वत:ला मिळालेल्या मालमत्तेचेच मृत्यूपत्र तयार करता येते. एकापेक्षा जास्त व्यक्तींचे हक्क असलेल्या मालमत्तेचे मृत्यूपत्र कायद्याने अडचणीचे ठरते.
-----------
मृत्यूपत्राविषयी गोपनीयता महत्त्वाची
आमच्या आजोबांची स्वत:च्या मालकीची मिळकत होती. कोरोना काळात त्यांना कुटुंबाची चिंता भेडसावू लागल्याने त्यांनी स्वमर्जीने मृत्यूपत्रात मालमत्तेची नोंद करून वाटप करून ठेवले आहे.
- गणेश देशमुख
-----------
मृत्यूपत्राला देता येते आव्हान
मृत्यूपत्र स्वखुषीने तयार करण्यात आले व त्यासाठी साक्षीदार, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात आली असली तरी, मृत्यूपत्रातील मालमत्तेबाबतची संबंधित व्यक्ती मृत्यूपत्राला न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
---------------
संख्या वाढली, पण निश्चित आकडेवारी नाही
गेल्या वर्षभराच्या काळात मृत्यूपत्र तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु मृत्यूपत्र नोटरी पद्धतीने व दुय्यम निबंधकांकडे नोंदविले जात असल्याने त्याची निश्चित अशी आकडेवारी संकलित करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. परंतु एरव्ही होणाऱ्या मृत्यूपत्रापेक्षा या काळात संख्या वाढली आहे.
---------
मृत्यूपत्र हे स्वखुषीने करून देणारा दस्तऐवज आहे. त्यामुळे त्याला कायदेशीर प्रक्रियेत बसवून तयार करणे गरजेचे आहे. मात्र, मृत्यूपत्राविषयी व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाद होऊ शकतात. त्यामुळे मृत्यूपत्र तयार करताना संबंधित व्यक्तीच्या दस्तऐवजात वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडणे आवश्यक आहे.
- अॅड. मनोजकुमार हगवणे-पाटील
------
मृत्यूपत्र नोटरी केले तरी चालते. साधारणत: वाढते वयोमान, भविष्यातील संगोपनाची चिंता व वडिलोपार्जित मालमत्तेचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी प्रामुख्याने मृत्यूपत्र केले जाते. त्याला कायदेशीर जोड देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
-अॅड. भाऊसाहेब गंभिरे, नोटरी