वह्यांच्या भावात यंदाही वाढ
By admin | Published: June 17, 2015 11:24 PM2015-06-17T23:24:27+5:302015-06-18T00:19:36+5:30
लगबग : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी
नाशिक : दहावी-बारावी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. तसेच प्राथमिक शाळांनाही सुरुवात झाल्याने शहरात शैक्षणिक साहित्य खरेदीची लगबग पहावयास मिळत आहे. यंदा वह्यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कागदांच्या किमतीत सुमारे दहा टक्के वाढ झाल्याने दर वाढल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून, शालेय स्तरावर पाठ्यपुस्तके सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत दिली जातात. वर्षभरासाठी लागणाऱ्या विविध विषयांनुसार स्वतंत्र वह्यांची खरेदी केली जात आहे. शाळेय विद्यार्थ्यांसाठी लहान आकाराच्या एकेरी, दुहेरी शंभर, दोनशे, तीनशे पानी वह्यांची खरेदी नागरिकांकडून केली जात आहे. तर महाविद्यालयीन युवक मोठ्या आकाराची लॉन्ग एक्स नोटबुक खरेदी केल्या जात आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा लहान आकाराच्या वह्यांसह मोठ्या वह्यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. वह्यांचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांकडून किमतींमध्ये चार ते आठ रुपयाने प्रति वहीमागे वाढ के ली आहे. एक किंवा दोन डझन वह्या घेतल्यास काही प्रमाणात मोजक्या दुकानांमध्ये कंपनीच्या दरात सूट दिली जात आहे. यंदा आकर्षक रंगात आणि चित्रांमध्ये वह्या उपलब्ध आहेत.