दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेनच्या गुणवत्तेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:15 AM2021-03-26T04:15:49+5:302021-03-26T04:15:49+5:30
नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२१ परीक्षाचा निकाल अवघ्या दहा दिवसात जाहीर करण्यात ...
नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन २०२१ परीक्षाचा निकाल अवघ्या दहा दिवसात जाहीर करण्यात आल्यानंतर १८ मार्चला पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील जेईई मेनचा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) जाहीर झाला असून या पहिल्या टप्प्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत आपल्या गुणवतेत आणखीनच वाढ करून घेत यश संपादन केले आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या जेईई परीक्षेत ९९ पर्सेंटाईलपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणवत्तेत आणखीन सुधारणा केली असून नाशिकमधून तन्मय राणे याने ९९.४४ पर्सेंटाईलहून ९९.८३, समीर देशपांडेने ९९.७० हून ९९.७७, गौरंग दहाडने ९९.१० हून ९९.६२ ,संदेश अहिरे ९९,०८ हून ९९.१४ पर्सेंटाईपर्यंत गुणवत्तेत वाढ केली आहे. तर काही विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत मिळविलेली गुणवत्ता याही परीक्षेत कायम राखली असून या सोहम पाटीलने ९९.५४ प्रसन्न दवंगे ९९.१९, पर्सेंटाईल गुणांसह फेब्रुवारी महिन्यातील जेईई मेन परीक्षेत मिळालेल्या गुणांइतकेच गुण मार्चमधील परीक्षेतही मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचप्रमाणे कृषिकेश कच्छवा, हरिष गायधनी व रोहीत शाह यांनी ९९.१७ गुणांसह यश संपादन केले आहे.
एनटीएकडून कोरोना प्रादुर्भाव विचारात घेत विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी या परीक्षेसाठी मिळावी म्हणून यावर्षी जेईई मेन परीक्षा चार महिन्यांमध्ये चार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये घेतली जात आहे. यात फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात दोन टप्यात परीक्षा घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कमी अधिक फरकाने दुसऱ्या टप्प्यातही यश संपादन केले आहे.
इन्फो-
कोरोनाच्या संकटामुळे व अन्य कारणांमुळे पहिल्या टप्प्यात परीक्षा देऊ शकले नव्हते अशा विद्यार्थ्यांनीही या परीक्षेत लक्षवेधी यश संपादन केले आहे. आता एप्रिल आणि मे महिन्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा होणार आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेचा वेळापत्रकानुसार सोयीच्या तारखेनुसार परीक्षेचे नियोजन करता येणार आहे.परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यासाठी अर्ज करून विद्यार्थी परीक्षा देऊन शकणार आहे. मात्र चारही टप्प्यांमध्ये ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळतील ते गुण अंतिम गुण म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याने यापूर्वी परीक्षा दिलेले विद्यार्थी पुढील टप्प्यात सहभाग घेत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत.
===Photopath===
250321\25nsk_35_25032021_13.jpg
===Caption===
जेईई परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी