मालेगावी प्रतिबंधित क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:11 PM2020-04-18T21:11:46+5:302020-04-19T00:39:26+5:30
मालेगाव : शहरात कोरोनाच्या बळींबरोबरच बाधितांच्याही संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
मालेगाव : शहरात कोरोनाच्या बळींबरोबरच बाधितांच्याही संख्येत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रारंभी सात प्रतिबंधित क्षेत्र (कन्टेमेंन्ट झोन) तयार करण्यात आले होते. शनिवारी या झोनमध्ये वाढ करण्यात आली असून, शहरात रुग्णसंख्या वाढल्याने आता एकूण १३ प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहेत. उत्तर महाराष्टÑात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मालेगावी आढळून आले आहेत. यामुळे राज्य शासनाने या शहराकडे विशेष लक्ष पुरविले आहे. शुक्रवारी कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. रात्री उशिरा नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छोरिंग दोर्जे यांनी शहरातील बंदोबस्ताचा व प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेत कडेकोड बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मनपा, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शहरात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील नागरिकांना भाजीपाला कमी पडू नये म्हणून शनिवारी शहरालगतच्या दाभाडी-सटाणा रस्त्यावरील राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भाजीपाल्याचा लिलाव झाला. आडतदारांना विशेष पास देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतमाल विक्रीसाठी आणला होता. या ठिकाणांहून शहरासह नाशिक, मुंबई इतर ठिकाणी भाजीपाला रवाना करण्यात आला आहे.
शुक्रवारी एकाच दिवशी १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच पोलीस यंत्रणेने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेडिंग लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातून नागरिक घराबाहेर पडणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान,महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई केल्याच्या निषेधार्थ स्वच्छता कर्मचाºयांनी शनिवारी कामावरच येणे टाळल्याने स्वच्छतेचा निर्माण झाला आहे. शनिवारी सकाळी हजेरी सेंटरवर सफाई कामगार आलेला नव्हता. या संदर्भात सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रभारी स्वच्छता निरीक्षक उमेश सोनवणे यांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पोलीसांकडून कारवाई होत असल्याने कामावर कोणी येण्यास तयार नसल्याचे सांगितले.