रेल्वेस्थानकामधील बंदोबस्तात वाढ
By admin | Published: October 2, 2016 11:57 PM2016-10-02T23:57:08+5:302016-10-02T23:58:31+5:30
नाशिकरोड : प्रवाशांच्या वाहनांची तपासणी
नाशिकरोड : देशात सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असून, रेल्वे व प्रवाशांच्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
काश्मीर खोऱ्यात उरी येथील लष्कराच्या तळावर पाकच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून ३८ अतिरेक्यांचा खात्मा केला. यामुळे भारत व पाकमधील संबंध ताणले गेले असून, पाककडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस यांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक जुबेर पठाण, सहायक पोलीस निरीक्षक संजय गांगुर्डे, एम.एस. महाले तसेच रेल्वे सहायक पोलीस निरीक्षकनितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे व प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साध्या वेशातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून, रेल्वेस्थानक परिसरात कुठेही बेवारस वस्तू दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले
आहे. (प्रतिनिधी)