सोयाबीनच्या दरवाढीमुळे लागवड क्षेत्रात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:43+5:302021-09-08T04:19:43+5:30
वणी : सध्या सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे सोयाबीन क्षेत्र वाढले आहे. दिंडोरी तालुक्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड ...
वणी : सध्या सोयाबीनचे दर गगनाला भिडण्याच्या संकेतामुळे सोयाबीन क्षेत्र वाढले आहे. दिंडोरी तालुक्यात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ९० रुपयांच्या पुढे दर असून, दरात असलेले तेजीचे वातावरण भविष्यातही राहील, असा अंदाज बांधत सोयाबीन लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहेत.
सोयाबीन या पिकावर रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता कमी व हमखास आर्थिक स्थैर्य देणारे पीक अशी ओळख आहे. दरम्यान, सोयाबीन हे प्रामुख्याने धुळे येथे विक्री करण्यात येते. सोयाबीनच्या पावडरपासून तेल तयार करणे, प्रोटीन्स तयार करणाऱ्या पदार्थांमध्ये वापरणे, सोयाबीनची वडी तयार करणे असा वापर सोयाबीनचा करण्यात येतो; मात्र प्रामुख्याने धुळे येथील ऑईल मिलमध्ये तेल उत्पादनासाठी सोयाबीन खरेदी करणाऱ्या अनेक मिल असून, हे सर्व सोयाबीन त्याठिकाणी विक्रीसाठी पाठविले जाते. दरम्यान, खरेदी करण्यापूर्वी विविध मशीनद्वारा दर्जा, प्रतवारी या बाबी निकषाच्या कसोटीवर पार पडल्या तर चांगला भाव देण्यात येतो. भविष्यातील दरवाढीचा अंदाज पाहून लागवड क्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय उत्पादकांनी घेतला आहे. दरम्यान, सोयाबीनला मागणी वाढण्याच्या संकेतानुसार अनेकांनी नशीब आजमावण्यासाठी सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे धाडस केले आहे.