डास प्रतिबंधक फवारणी वेळेत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:02 PM2019-11-09T23:02:42+5:302019-11-10T00:52:14+5:30
शहरात अवकाळी पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडत असल्याने डेंग्यूचा मुक्कामही वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणीच्या वेळेत वाढ करण्याचे आदेश आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी दिले आहेत.
नाशिक : शहरात अवकाळी पाऊस नोव्हेंबरपर्यंत पडत असल्याने डेंग्यूचा मुक्कामही वाढला असून, त्या पार्श्वभूमीवर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणीच्या वेळेत वाढ करण्याचे आदेश आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीच्या सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी दिले आहेत.
डेंग्यू रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर सभापती कुलकर्णी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी आढावा घेतल्यानंतर हे आदेश दिले आहेत. शहरात पावसाळ्यात ८५४ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले असून, त्यातील २०७ रुग्णांना तपासणीअंति डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही संख्या अधिक असण्याची शक्यता असल्याचेही सभापती कुलकर्णी यांनी सांगितले. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धूरफवारणीची वेळ ४५ मिनिटांऐवजी ९० मिनिटे करण्यात आली आहे. त्याच प्रमाणात दोन वेळेत धूरफवारणी करण्यात यावी तसेच औषध फवारणीसाठी प्रत्येक विभागात पाच मशीन असल्याने मशीन वाढवावे तसेच दोन सत्रांत करण्याचे आदेशही डॉ. कुलकर्णी यांनी दिले.
परीसरात डेंग्यूचे डास आढळल्यास प्रथम आपल्या प्रभागाच्या नगरसेवकांना कळवावे तसेच आणि त्यांच्यामार्फत प्रशासनाकडून उपाययोजना करून घ्याव्या. याउपरही प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. डेंग्यूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच नागरी प्रबोधनावर भर देण्यात येणार आहे. स्टिकर, बॅनर आणि होर्डिंग्ज लावून प्रबोधन करण्यात येणार आहे. शाळा-शाळांमध्येदेखील प्रबोधन करण्यात येणार आहे. या बैठकीस घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. सुनील बुकाणे, डॉ. प्रशांत थेटे, डॉ. अजिता साळुंखे यांच्यासह विभागीय स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
मुलांमार्फत पालकांचे प्रबोधन
शाळांमधील मुलांमार्फत पालकांचे प्रबोधन करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. घराच्या आवारात छतावर, फुलदाणी, फ्रिजमध्ये पाणी साचू देऊ नये तसेच परिसरात स्वच्छता ठेवावी यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने अखेरीस मुलांनी सांगितलेले पालक ऐकतील या उद्देशाने शाळांमध्ये प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे.