तलावाची साठवण क्षमता वाढवा
By admin | Published: September 29, 2015 11:29 PM2015-09-29T23:29:35+5:302015-09-29T23:30:27+5:30
३८ गाव पाणी योजना : भुजबळ यांच्या बैठकीत सूचना
येवला : येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारात ५५ गावाचा समावेश होणार यासाठी साठवण तलावाची क्षमता वाढावी, नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण २१ गावांना शाश्वत पाणी मिळावे. या योजनेचा समावेश पंचायत समिती कृती आराखड्यात करावा याबाबत नाशिक येथे बैठक संपन्न झाली.
येवला तालुक्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उभारलेल्या ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची ७ नोव्हेंबर २००९ रोजी तत्कालीन जलसंपदा व पाणीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार छगन भुजबळ यांचे हस्ते ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची चाचणी करून त्या अंतर्गत येवला तालुक्यातील टँकर ग्रस्त २३ गावे व उर्विरत १५ गावे असे एकूण ३८ गावांना पाणीपुरवठा सुरु केला गेला. सन २०१६ मधील १ लाख ९ हजार ६०० लोकसंख्या व सन २०३१ मधील १ लाख ४२ हजार ६०० लोकसंख्या असा अंतरिम टप्पा मानून दरडोई ५५ लिटर पाणी दिले जाते. दरम्यान ३८ गाव पाणीपुरवठा समिती स्थापन होऊन हि योजना १ एप्रिल २०१२ पासून आमदार छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली समिती अध्यक्ष सचिन कळमकर, उपाध्यक्ष मोहन शेलार, व सहकारी ही योजना सक्षम पणे राबवित आहे. यंदा कमी पर्जन्यमान असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मूळ ३८ गाव प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत टंचाई ची सात गावे समाविष्ठ झाली. अशा ४५ गावांना पाच दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण आखले गेले. नियमित पाणीपट्टीदेखील वसूल करण्यात येते. याशिवाय चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, सातारे, कोळम बु., मुरमी, बाळापुर, वाईबोथी, कोटमगाव खुर्द, कोटमगाव बुद्रुक, बोकटे, देवळाणे, अनकाई, घुलेगाव, अंगुलगाव, तांदुळवाडी, गुजरखेडे, खैरगव्हाण अशा एकूण १७ गावांनी ठरावाद्वारे मागणी करून या योजनेत आम्हाला समाविष्ट करून घ्यावे असा आग्रह धरला आहे. तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, रहाडी, पिंपळखुटे, पन्हाळ साठे, वाघाळे, सोमठाण जोश, आहेरवाडी, कोळम, पांजरवाडी, हडप सावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडे, धामणगाव, या अवर्षणप्रवण क्षेत्रातील २० गावांना शाश्वत पाणीपुरवठा योजना नाही. व या गावांना आजही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यासाठी नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणातून योजना प्रस्तावित करावी अशा सूचना आमदार छगन भुजबळ यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, गटविकास अधिकारी सुनील आहिरे, कळमकर, मोहन शेलार, प्रकाश वाघ, महेश पैठणकर, डी.जी. सपकाळे, उत्तम घुले आदि उपस्थित होते. (वार्ताहर)