संस्कृतचा अभ्यास वाढावा
By Admin | Published: December 27, 2015 10:51 PM2015-12-27T22:51:17+5:302015-12-27T22:53:35+5:30
लीना हुन्नरगीकर : संस्कृत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन; ३१ पर्यंत रंगणार स्पर्धा
नाशिक : संस्कृत नाट्य स्पर्धेतून नाटकांच्या सादरीकरणाबरोबरच संस्कृत भाषेचा अभ्यास, संशोधन वाढावे, नाटकांतून मनोरंजनासह समाजाचे उद्बोधनही व्हावे, अशी अपेक्षा प्रा. डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी व्यक्त केली.
पंचावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी संस्कृत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आजपासून या स्पर्धेला प्रारंभ झाला. ३१ डिसेंबरपर्यंत स्पर्धा चालणार आहे. नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम अध्यक्षस्थानी होते. परीक्षक श्रीनंद बापट, अंजली पर्वते, तरंगिणी खोत, समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. हुन्नरगीकर म्हणाल्या, पूर्वी नाटकांतून रुढी-परंपरांविरोधात प्रबोधन केले जात असे. आतादेखील रंजनासह प्रबोधनावर भर द्यायला हवा. संस्कृत स्पर्धेमुळे भाषेला फायदा होत असल्याचेही त्या म्हणाल्या. रवींद्र कदम यांनी जगातील पहिली रंगभूमी नाशिक असल्याचे सांगितले. रामायणकाळात चेहऱ्याला रंग लावून, वेशांतर करून सीतेचे अपहरण या भूमीतून झाले. अशा भूमीत भाषेची जननी असलेल्या संस्कृत भाषेतील नाट्यस्पर्धा होणे हा चांगला योग असल्याचे ते म्हणाले.
वेदांग जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विद्याधर निरंतर, भगवान हिरे, अरुण गिते यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सुरेश गायधनी, माणिक कानडे, रोहित पगारे उपस्थित होते. स्पर्धेत उद्या (दि. २८) नदीसूक्तम, वक्रतुंड, ऐकक संघ, कथा वार्धक्सस्य इयम ही नाटके होणार आहेत. उद्या होणारे ‘सुंदरा’ हे नाटक रद्द झाल्याचे सांगण्यात आले.