नागरिकांत आत्महत्येच्या प्रमाणात वाढ; भावनिक, आर्थिक आधाराची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:45+5:302021-06-19T04:10:45+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाकाळात निम्म्याहून अधिक नागरिकांना आर्थिक ताणतणाव, भविष्यातील चिंतांनी ग्रासले होते. त्यातही जे नागरिक मानसिकदृष्ट्या भक्कम होते ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाकाळात निम्म्याहून अधिक नागरिकांना आर्थिक ताणतणाव, भविष्यातील चिंतांनी ग्रासले होते. त्यातही जे नागरिक मानसिकदृष्ट्या भक्कम होते किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी सातत्याने संवाद होता, अशा नागरिकांनी कितीही मोठे संकट असले तरी आत्मघातासारखे पाऊल उचलले नाही. मात्र, आर्थिक स्थिती बिकट, भविष्याची चिंता, तसेच कुणाशीही मनमोकळा संवाद नसल्याने आलेल्या मानसिक दडपणामुळे आत्महत्या करणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गत कोरोनाकाळात जिल्ह्यात तब्बल ८३ जणांनी आत्महत्या केली आहे.
कोरोनाकाळातील विविध समस्यांमुळे मानसिक आजाराच्या बाबतीत पुरुषांसह महिलांच्या मानसिक आजाराच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाल्याचे दिसून येत आहे, तसेच मानसोपचारतज्ज्ञांच्या मते बरेच रुग्ण आत्महत्या करतात, तेव्हा ते मानसिक आजाराने त्रस्त असतात. त्यात उदासीनता, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता आणि व्यक्तिमत्त्वविकृती यामध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असते. कोरोनाच्या काळात सध्या सर्वाधिक मानसिक आजार हे युवा आणि मध्यमवयीन पिढीला सतावत आहेत. कोरोनाकाळातील आर्थिक, नोकरीतील, सामाजिक दडपण यासारख्या मोठमोठ्या घडामोडींमुळे ते सहज मानसिक तणावाखाली जातात. त्यातून त्यांना मानसिक विकार होण्याचेही प्रमाण वाढले आहे. नैराश्य आणि चिंताविकार या मानसिक आजारांचे मुख्य कारण ताणतणाव हेच असते. तारुण्यात कर्तृत्व गाजवून झाल्यानंतर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात कामाविना नुसतेच बसून राहणाऱ्या ज्येष्ठांमध्येदेखील लोकांमध्ये मानसिक आजारांचे प्रमाण अधिक दिसून येऊ लागले आहे. या आजारांशी लढण्यासाठी प्रभावी व्यूहरचना आणि धोरण लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कुटुंबाशी हवा संवाद
पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने आपल्या समस्यांबाबत कुटुंबातील लोक घरातील इतर सदस्यांशी बोलत आपले मन हलके करत असत, तसेच एकत्रित कुटुंबात कुणा एकाच व्यक्तीवर घर चालणे किंवा ठप्प होत नव्हते. त्यामुळे कुणाची ना कुणाची थोडीफार कमाई झाली तरी कुटुंब चालत होते. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीत हे शक्य होताना दिसत नसल्याने मानसिक आजार वाढीमागील तेदेखील प्रमुख कारण आहे.
हे दिवसही जातील...
जीवनात चढ-उतार येत असतात. आयुष्यात अनेक कटू अनुभवदेखील घ्यावे लागतात, हे सांगणारी ज्येष्ठांची पिढीच घरात नसल्यानेही खूप फरक पडला.
सगळेच दिवस सारखे नसतात, हे दिवसही जातील, असे सांगून धीर देणारा मायेचा हात कुटुंबात असेल, तर संबंधिताला आलेले नैराश्यदेखील दूर जाऊ शकते.
------------------------------
मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात
कोरोना लाटेमुळे आर्थिक आघाताइतकाच मानसिक आघातदेखील खूप प्रचंड प्रमाणात झाला. मात्र, आपल्याकडे मनाबाबत तितकीशी सजगता नसते. मात्र, कोरोनाकाळात सल्ला किंवा मानसोपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे.
-डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ
अनेक घरांमध्ये आर्थिक विवंचना किंवा भविष्याच्या चिंतेपायी मोठ्या प्रमाणात ताणतणाव वाढला. मानसिकदृष्ट्या संवेदनक्षम असलेल्या नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळेच सल्ला तसेच उपचारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण निश्चितच वाढले आहे.
-डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ