शहरातील उकाड्यामध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 01:19 AM2020-09-05T01:19:44+5:302020-09-05T01:20:05+5:30
नाशिक : शहर व परिसराचे हवामान दोन दिवसांत अचानकपणे बदललेले अनुभवयास येत आहे. शहरात दिवसा उकाडा जाणवू लागला आहे.
नाशिक : शहर व परिसराचे हवामान दोन दिवसांत अचानकपणे बदललेले अनुभवयास येत आहे. शहरात दिवसा उकाडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी (दि .४) शहराचे कमाल तापमान थेट ३३.१ अंश इतके नोंदविले गेले. वातावरणात दिवसभरात कमालीचा दमटपणा नाशिककरांना जाणवला.
गुरुवारी रात्री १० वाजेनंतर शहरासह नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळागाव या भागात जोरदार सरींचा वर्षावही झाला होता, तर शुक्रवारी पहाटे शहराने धुक्याची चादर पांघरल्याचे चित्र पहावयास मिळाले. एकूणच लहरी निसर्गाने आपले रुप बदलल्याने वातावरण बदलाचा अनुभव नागरिकांना येत आहे. शुक्रवारी पहाटे शहर धुक्यात हरविले होते. यामुळे गोदावरीच्या विविध पुलांवरून नयनरम्य दृश्य नजरेस पडले. लक्ष्मीनारायण पुलावरुन तर तपोवनातील नदीपात्राचा परिसर जणू काश्मीरसारखा भासू लागला होता. यामुळे पहाटसमयी फेरफटका मारणाऱ्या नाशिककरांना निसर्गाचा हा नजारा कॅमेºयात टिपण्याचा मोह आवरता आला नाही. काहींनी सकाळची ही टिपलेली दृश्ये सोशल मीडियावरही पोस्ट केली आहेत.
आठवडाभरापूर्वी शहराचे कमाल तापमान २५ तर किमान तापमान २१ अंशांच्या जवळपास स्थिरावत होते. मागील चार दिवसांपासून अचानकपणे शहराच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागल्याचे हवामान केंद्राच्या नोंदीवरून दिसते.
मंगळवारी (दि.१) कमाल तापमानाचा पारा २८ अंशापर्यंत सरकला, मात्र गुरुवारी (दि.३) पारा थेट ३२.५ अंशांवर स्थिरावला. यामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नाशिककरांनी आपली घरे, कार्यालयातील पंख्यांचा वेग वाढवावा लागत आहे. शुक्र वारी तर उन्हाळ्याप्रमाणे कमाल तापमान ३३ अंशांच्या पुढे सरकले. दिवसभर नाशिककरांना उन्हाचा चटका व उकाडाही जाणवला.