येवला तालुक्यात भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 11:45 PM2021-08-01T23:45:07+5:302021-08-02T01:01:24+5:30
जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.
जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.
पूर्वी निफाड, दिंडोरी, कसमा पट्ट्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला नाशिक, पिंपळगाव बसवंत बाजार समिती काबीज करत होता. पण आता येवला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, तिखट मिरची पिकांची लागवड केल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादनही सुरू झाल्याने चांगले बाजारभाव मिळाले, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.
दिवसेंदिवस तरुण नोकरीच्या मागे न धावता शेती व्यवसायाकडे जोर देत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे उत्पादन सुरू झाले असून नाशिकसह राज्य, परराज्यात विक्री करत आहे.
चौकट...
कमी पाण्यात जास्त उत्पादन
सध्या येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनही विहिरी, नदी-नाले, बोरवेल कोरडी असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. पण शेतकऱ्यांनी आपले शेततळे, विहीर या साधनातील थोड्या पाण्यावर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग पेपर इत्यादी साधनांचा उपयोग केल्याने कमी पाण्यातही जास्त उत्पादन शेतकरी घेत आहे, त्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असून मल्चिंग पेपरमुळे औषधांच्या खर्चाबरोबरच तणाचाही बंदोबस्त होत आहे.
सुशिक्षित तरुण वळाले शेतीकडे
गेली दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग साथीमुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण शेतीकडे वळाले असून शेतात नवनवीन प्रयोग करून, शेतात विविध प्रकारची पिके घेऊन चार पैसे कमावण्यात व्यस्त आहे.
नर्सरीमध्ये रोपांची बुकिंग
पूर्वी शेतकरी आपल्या शेतात रोपे तयार करून त्यांची लागवड करत होता. आता त्यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करून नर्सरीमध्ये रोपे बुक करून लागवडीसाठी दिलेल्या तारखेला रोपे मिळत असल्याने शेतकरी त्या पद्धतीने लागवड करत आहे.
कोट...
दरवर्षी मका, सोयाबीन पिके घेत होतो. यावर्षी या पारंपरिक पिकाबरोबर कोबी आणि मिरचीचे पीक घेतले आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन यामुळे कमी पाण्याबरोबर मेहनतीला सोपे जाते. बाजारभाव चांगले मिळाल्यास पुढील पिकांसाठी भांडवल निर्माण होऊन चार पैसे पदरात पडतील.
- अनिल चव्हाण, शेतकरी.