पाण्याच्या पातळीत वाढ; चार धरणांतून विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 12:58 AM2020-08-15T00:58:56+5:302020-08-15T00:59:19+5:30
शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला.
नाशिक : शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारीदेखील हजेरी कायम ठेवली. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ६०२ मिलिमीटर म्हणजे सरासरी ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या पावसाच्या माहेरघरी अतिवृष्टी झाली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये अनुक्रमे १२० व ११० मिलिमीटर इतका पाऊस झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस नोंदविला गेला आहे.
दारणा धरणात ९३ टक्के पाणीसाठा
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६७ टक्के तर धरण समूहात ४८ टक्के जलसाठा झाला असून, दारणा धरण ९३ टक्के भरल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून धरणातून विसर्ग सुरू केल्याने दारणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.
च्याशिवाय शंभर टक्के भरलेल्या भावली व हरणबारी या दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. पुनंद व माणिकपुंजमधून देखील काही प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाला घ्यावा लागला.
पेठला ५३ व सुरगाण्याला ६२ मिलिमीटर पाऊस झाला. अन्य तालुक्यातही पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतकरी सुखावले आहेत. या पावसामुळे नदी, नालेही वाहू लागले असून, धरणांच्या साठ्यात वाढ झाली. चोवीस तासात जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन टक्क्याने वाढ होऊन ५३ टक्के पाणी साठले आहे.