शंभरफुटी रस्त्यावर वाढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 11:08 PM2019-06-15T23:08:17+5:302019-06-16T00:58:19+5:30
वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : वडाळागावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या शंभर फुटी रस्त्यालगत छोट व्यावसायिक, टपरीधारकाचे अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
या मार्गावरील मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत असलेल्या झोपड्यांमुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण रखडले होते. अतिक्रमणामुळे कामकाजास होणारा विलंब पाहता या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. मात्र पुन्हा-पुन्हा अतिक्रमण होतच आहे. वर्षभरापूर्वी अतिक्र मण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुमारे साडेचारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या होत्या.
येथील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीचा रस्ता मोकळा झाला आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु आता पुन्हा मांगिरबाबा चौक ते पांढरी आई चौक या गावाच्या बाजूने रस्त्यालगत अनधिकृत टपल्या वाढत आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे दुकानात येणारे ग्राहक हे आपली वाहने सर्रासपणे शंभर फूट रस्यावर लावतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होते. महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने मोहीम राबवून अनधिकृत टपऱ्या हटण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.