भाऊबंदकीच्या वादातून वाढोलीला हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 11:14 PM2021-02-08T23:14:11+5:302021-02-09T00:35:24+5:30
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या वाढोली येथील एका कुटुंबास भाऊबंदकीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी १४ जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
महेश भास्कर महाले (वय २०) रा.वाढोली ता.त्र्यंबकेश्वर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी (दि.७) दुपारी साडे तीन वाजता फिर्यादीची आई सिंधूबाई घरात असताना संशयित आरोपी गणेश दिनकर महाले, निवृत्ती दिनकर महाले, संदीप दिनकर महाले, रामकृष्ण बाळू महाले, संतोष बाळु महाले, बाळू हनुमंत महाले, दिनकर हनुमंत महाले, जिजाबाई बाळू महाले, स्वाती संतोष महाले, गायत्री रामकृष्ण महाले, ताराबाई दिनकर महाले, अश्विनी निवृत्ती महाले, स्वाती गणेश महाले व सरला संदीप महाले यांनी घरात घुसून सिंधूबाईस बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच फिर्यादीचे वडील भास्कर यांना लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण केली. यामध्ये सात जण जखमी झाले. त्यांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील चार गंभीर जखमींना नाशिक येथे हलविले, तर तीन जण त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दरम्यान त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर संशयितांविरुद्ध जबर मारहाणीचा व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हवालदार घोडे, पोलीस नाईक प्रदीप भाबड हे करीत आहेत.