मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:42 PM2020-08-27T22:42:14+5:302020-08-28T00:40:08+5:30
नाशिक : गौरी गणपतीमुळे फुलांची मागणी वाढत चालल्याने हार आणि फुले महागले आहेत. बुधवारी गौरी पुजनाच्या निमित्ताने फुल बाजारात दर वाढलेले आढळले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव मात्र कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक : गौरी गणपतीमुळे फुलांची मागणी वाढत चालल्याने हार आणि फुले महागले आहेत. बुधवारी गौरी पुजनाच्या निमित्ताने फुल बाजारात दर वाढलेले आढळले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत फुलांचे भाव मात्र कमीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सणासुदीमुळे फुलांना दरवर्षी मागणी वाढते. त्यामुळे दर देखील तेजीत असतात. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादीत असल्याने गणेशोत्सव काळात असणारी फुलांची मागणी यंदा नाही. दरवर्षी गणेशोत्सव काळात लहान मोठे हजारो हार रोज खपतात, मात्र यंदा मोजकेच गणपती असून गल्ली बोळात तर लहान मंडळांनी गणेशोत्सवच साजरा केलेला नाही. त्यामुळे अपेक्षीत मागणी नाही. फुलांच्या सजावटी यंदा नाही. कोरोनामुळे ग्राहकांची फुल बाजारातील संख्या रोडावली आहे. मात्र, दोन दिवस गौरींच्या आगमनामुळे नियमीत कालावधीत असलेल्या फुलांपेक्षा दर जास्त होते. देवी देवतांना लागणा-या पत्री, जास्वंदी, शेवंती, गुलाब त्याच बरोबरच जास्वंदीचे हार आणि अन्य फुल हार देखील चाळीस रूपयांपासून दीडशे रूपयांपर्यंत गेले आहेत. वेणी वीस रूपये तर चांगली डांगराची फुले वीस ते चाळीस रूपये या दराने होते. मुकी जास्वंद तर पाच रूपयांना एक या प्रमाणे उपलब्ध होती. दुर्वा आणि पांढ-या दुर्वांचे दर दहा रूपयांपासून पुढे आहेत. गणपतीपाठोपाठ गौरींचे आगमन झाल्याने मागणी वाढल्याचे फुलविक्रेत्यांनी सांगितले.