सहा दिवसात कोविड नियंत्रणाचा वाढला आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:15 AM2021-05-26T04:15:16+5:302021-05-26T04:15:16+5:30
नाशिक : अत्यंत कठीण आणि कटु अनुभवातून गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळू लागला आहे. लॉकडाऊन ...
नाशिक : अत्यंत कठीण आणि कटु अनुभवातून गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळू लागला आहे. लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहेच; परंतु आता आढळणाऱ्या रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन तसेच बेडदेखील उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा दिवसात कोरोना नियंत्रणाची स्थिती अधिक सुधारली आहे.
एप्रिल ते मे महिन्याचा पंधरवडा नाशिककरांसाठी जीवघेणा ठरला होता. सर्वत्र सायरनचे आवाज आणि रुग्णांच्या कुटुंबीयांची धावपळ असे विदारक चित्र नाशिककरांनी डोळ्यांनी पाहिले. लॉकडाऊनची अंमलबाजवणी केल्यानंतर शहरातील काेरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. २४ तारखेला लॉकडाऊनचा बारा दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर दिवसेंदिवस परिस्थितीत सुधारणा झाल्याचे दिसून येते.
रुग्णसंख्येत घट झालेली आहेच शिवाय रुग्णालयात गंभीर अवस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांचे प्रमाणदेखील कमी होऊ लागले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचीदेखील धावपळ कमी झालेली आहे. शहर परिसरातील कोेविड सेंटर्सदेखील रिकामे झाल्याने दिलासा मिळालेला आहे. अवघ्या आठ दिवसांतील रुग्णवाढीचा आलेख पाहिल्यास त्यामध्ये घट झाल्याचे दिसते. १९ मे रोजी ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १८,४९३ इतकी होती ती सोमवारी अवघी १३,७१४ इतकी झाली आहे. १८ मे रोजी दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७३ इतकी होती हीच सोमवारी ६७७ इतकी खाली आली. पॉझिटिव्हिटी रेट ८.२० वरून ५.७४ टक्क्यांवर आला आहे.
रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी आरोग्य यंत्रणेकडून आता तिसऱ्या लाटेचे नियोजन केले जात असून, त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे.
-इन्फेा--
१) ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १८,४९३ (१९ मे रोजी असलेली) दि. २४ रोजी १३,७१४ पर्यंत.
२) दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०७३ (१८ मे रोजी असलेली ) दि. २४ रोजी ६७७वर.
३) पॉझिटिव्हिटी रेट ८.२० वरून ५.७४ टक्क्यांवर
४) रुग्णालयांमध्ये पाच हजारापर्यंत बेड्स रिकामे
५) ऑक्सिजनची मागणी २० टक्क्यांनी झाली कमी
६) १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा उपलब्ध