प्रशासन सुस्तावल्यानेच कोरोनाचा वाढला प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:28+5:302021-04-01T04:15:28+5:30
नाशिक : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर प्रशासनाला अचानक या आपत्तीला सामोरे जावे लागले. मात्र, त्यातून कोणत्याही प्रकारचा ...
नाशिक : गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर प्रशासनाला अचानक या आपत्तीला सामोरे जावे लागले. मात्र, त्यातून कोणत्याही प्रकारचा धडा प्रशासनाने घेतला नाही. उलट प्रशासन सुस्तावल्यानेच आता पुन्हा काेरोनाचा प्रादुर्भाव वाढला. इतकेच नव्हेतर, तो जीवघेणा ठरत असल्याचा आरोप महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. मंगळवारी (दि. ३० मार्च) झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा आरोप करतानाच प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती गणेश गीते होते. नाशिकरोड येथील महापालिकेच्या नूतन बिटको रुग्णालयात कुशल तंत्रज्ञ नसल्याने कोरोनाबाधितांचा मृत्युदर शंभर टक्के झाल्याचा गंभीर आरोप राहुल दिवे यांनी करीत वैद्यकीय विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रारही त्यांनी केली. गेल्या वर्षी एखाद्या परिसरात रुग्ण आढळल्यानंतर ज्या प्रमाणात बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची ॲन्टीजेन चाचणी, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसेच निर्जंतुकीकरण केले जात होते ते आता केले जात नसल्याने कोरोनाचा विस्फोट झाल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला. वैद्यकीय अधीक्षकपदाची पात्रता नसताना डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांची या पदावर करण्यात आलेली नियुक्ती आणि निवासी आरोग्याधिकाऱ्याची दोन्ही पदं भरली गेली नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १०३ मंजूर पदांपैकी ५३ पदे रिक्त आहेत. मानधनावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील मुदतवाढ दिली गेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गंगापूररोडवर आकाशवाणी केंद्राजवळ अनधिकृत भाजीविक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, कोरोनाच्या प्रादुर्भावास ते नियंत्रण देणारे ठरत असल्याचा आरोप योगेश हिरे यांनी केला.
तर मालेगावप्रमाणेच कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढवण्याची सूचना सलीम शेख यांनी केली.
इन्फो.
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे प्रशासन कोरोना संसर्ग राेखण्यात अपयशी ठरत असताना नागरिकांना आरोग्य नियमांचे पालन करीत नाही म्हणून दंड करण्याचा नैतिक अधिकार काय, असा प्रश्न समीना मेमन यांनी या वेळी केला. तर सिडकोतील संभाजी स्टेडिअममध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची सूचना मुकेश शहाणे यांनी केली. प्रतिभा पवार यांनी त्यांना दुजोरा दिला तर माधुरी बोलकर यांनी सातपूरमध्ये कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली.