आवक वाढली; कोथिंबीर मातीमोलच
By admin | Published: August 8, 2016 11:42 PM2016-08-08T23:42:57+5:302016-08-09T00:02:04+5:30
आवक वाढली; कोथिंबीर मातीमोलच
पंचवटी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने बाजार समितीत सर्वच पालेभाज्यांची प्रचंड आवक वाढली आहे. रविवारपाठोपाठ सोमवारीही कोथिंबीरला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मातीमोल बाजारभाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही कोथिंबीर फेकून दिली.
आवक वाढल्याने कोथिंबीर पाठोपाठ कांदापात, शेपू या पालेभाज्यांचेही बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पालेभाज्या लागवड खर्च तसेच गाडीचे भाडेही न सुटल्याने काही शेतकऱ्यांनी कोथिंबीरचे वक्कल बाजार समितीच्या आवारात फेकून देणे पसंद केले.
रविवारी कोथिंबीर १०० रुपये शेकडा दराने विक्र ी झाली होती. तर सोमवारी सायंकाळी कोथिंबीर मालाच्या काही वक्कलची ५० रुपये शेकडा या बोलीने लिलाव झाले. मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल काढणे सोपे जात आहे. रविवार पाठोपाठ सोमवारच्या दिवशी कोथिंबीरची प्रचंड आवक वाढल्याने बाजारभाव कोसळले.
सोमवारी शेतकऱ्यांनी आणलेला काही माल ओला असल्याने कोथिंबीर मालाचा लिलाव झाला नाही. सोमवारी कोथिंबीर १ रुपया, कांदापात ५, तर शेपू ४ रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली. (वार्ताहर)