नाशिककरांमध्ये हेल्मेट वापराचा वाढला टक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:53 AM2019-05-20T00:53:53+5:302019-05-20T00:54:07+5:30
रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले. यामुळे शहरात हेल्मेट वापराविषयी जनजागृती झाली तसेच कारवाईच्या धाकाने का होईना, नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर होताना दिसून येत आहे.
नाशिक : रस्त्यावर दुचाकी-चारचाकी अपघातात दुचाकीस्वारांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण शहरात वाढले होते. यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणी मोहीम सलग काही दिवस राबविण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले. यामुळे शहरात हेल्मेट वापराविषयी जनजागृती झाली तसेच कारवाईच्या धाकाने का होईना, नाशिककरांकडून मोठ्या प्रमाणात हेल्मेटचा वापर होताना दिसून येत आहे.
‘हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी’ हे प्रबोधनपर वाक्य अनेकांच्या नजरेतून जाते. तसेच कानीदेखील पडते; मात्र त्यानुसार हेल्मेटचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा वापर करणारे फार कमी, म्हणूनच पोलीस प्रशासनाला पुन्हा कारवाईचा बडगा नाशिककरांवर उगारावा लागला. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेने आठवडाभर नाकाबंदी करून नागरिकांना हेल्मेटची सवय लावण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेदरम्यान आश्चर्यकारक अशा बाबीदेखील समोर आल्या.
काही दुुचाकीस्वार महिला, पुरुष घरून निघताना हेल्मेट घेऊन निघाले जरी तरी त्यांचे हेल्मेट डोक्यावर नव्हे तर मोपेडच्या डिक्कीमध्ये असायचे. तसेच काही दुचाकीस्वार तर हेल्मेट डोक्यात अडकविण्यापेक्षा दुचाकीच्या ‘आरशा’ला संरक्षण देतानाही आढळून आले. काहींनी तर केवळ देखाव्यासाठी आणि पोलिसांच्या कारवाईपासून सुटका करून घेण्यासाठी दुचाकीला पाठीमागे हेल्मेट बांधून प्रवास करण्याचा फंडाही चालविल्याचे दिसले. एकूणच हेल्मेट असूनदेखील त्याचा वापरण्याचा केवळ कंटाळा नागरिकांकडून केला जात असल्याचेही समोर आले. पोलिसांकडून दंडात्मक कारवाई सुरू झाल्यानंतर नागरिकांनाही हेल्मेट वापराचे महत्त्व पटू लागले असून, शहरात हेल्मेट वापराचा टक्का वाढला आहे.
नांगरे पाटील यांनी हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिल्यानंतर काही प्रमाणात नागरिकांचा विरोध झाला; मात्र नाशिककरांनी हेल्मेट सक्ती स्वत:च्या सुरक्षिततेसाठी असल्याचे लक्षात घेत कारवाईचे स्वागत केले.
सामाजिक संघटनाही सहभागी
हेल्मेटसक्तीची तपासणी मोहीम सुरू होताच शहरातील विविध सामाजिक संघटनांनीदेखील या मोहिमेत सहभागी होऊन जनप्रबोधनाचा प्रयत्न केला. सुमारे पंधरा ते वीस स्वयंसेवी संघटनांचे स्वयंसेवक विविध नाक्यांवर पोलिसांसमवेत थांबून प्रबोधनपर घोषवाक्याचे फलक झळकविताना दिसून आले.
४ जे लोक हेल्मेट वापरत नव्हते, त्यांनी नवीन हेल्मेट खरेदी करून वापरण्यास सुरुवात केली. शहरातील सिग्नलवर हेल्मेटधारक दुचाकीस्वारांची संख्या आता जास्त दिसू लागली असून हे शहराच्या दृष्टीने शुभ वर्तमान मानले जात आहे.