‘त्या’ पाच दिवसांत वाढतो जंतुसंसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:44 AM2019-05-28T00:44:34+5:302019-05-28T00:45:21+5:30
प्रौढ झाल्यापासून प्रत्येक मुलीला सुरू होणारी मासिकपाळी वयाच्या पन्नाशीपर्यंत चालते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.
मासिक पाळी स्वच्छता दिन
नाशिक : प्रौढ झाल्यापासून प्रत्येक मुलीला सुरू होणारी मासिकपाळी वयाच्या पन्नाशीपर्यंत चालते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. शहरी भागात धकाधकीच्या जीवनशैलीमुळे या दिवसांमध्ये बहुतांश महिलांकडून वैयक्तिक स्वच्छतेकडे कानाडोळा केला जातो. परिणामी अलीकडे जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रत्येक महिलेचा मासिकपाळीशी संबंध येणे हे जरी नैसर्गिक असले तरी समाजात त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृतीवर भर दिला जात आहे. शाळा, महाविद्यालयांमधून अभियान राबविले जात आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील मुली-महिलांमध्ये मासिकपाळीविषयीची जागृती वाढीस लागताना दिसते. असे असले तरी मासिकपाळीत घ्यावयाची खबरदारी आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी कळत नकळत दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होताना दिसतो. वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन त्याचा आघात गर्भाशयावरही होतो, असे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता पवार यांनी सांगितले.
त्या चार ते पाच दिवसांत स्वच्छतेविषयी खबरदारी न घेतल्यास जंतुसंसर्ग होऊन गर्भाशयाला सूज येऊन ओटीपोटात दुखावा अधिक वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेविषयी महिलांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. शहरी, ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयांमधील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थिनी अनेकदा इच्छा व गरज असूनही त्या दिवसांत वैयक्तिक स्वच्छतेसाठी जाणे टाळतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालयीन प्रशासनाने मुलींच्या स्वच्छतागृहांच्या अवस्थेविषयी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
चार तासांत ‘सॅनेटरी’ बदलावे
मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्रावचे प्रमाण कमी असो किंवा अधिक महिला, तरुणींनी सॅनेटरी नॅपकिन चार तासांपेक्षा अधिक वेळ न ठेवता बदलणे गरजेचे आहे. कारण रक्तामध्ये जंतूंची वाढ झपाट्याने होत असते, त्यामुळे आजार होऊ शकतात असे डॉक्टरांनी सांगितले.
ओटी पोटात दुखणे, पुरळ येणे, रॅशेस येणे, वंध्यत्व येणे असे प्रकार यापूर्वीच्या काळात होत नव्हते; मात्र अलीकडे सॅनिटरी नॅपकीनचा वापर होऊनही या समस्या उद्भवतात. रक्तात जंतूंची निर्मिती अधिक होते. भुलथापा देणाऱ्या जाहिरातींना महिला बळी पडतात आणि महिला, मुली पॅड तीन तासांपेक्षा अधिक वेळ वापरून जंतुसंसर्गाला निमंत्रण देतात. केमिकल्सचा अधिकाधिक वापर पॅडमध्ये काही कंपन्यांकडून केला जाऊ लागल्याने जंतुसंसर्गाचा धोका उद्भवतो. सुती कापड वापरत असाल तर तेदेखील स्वच्छ धुऊन सूर्यप्रकाशत वाळविण्यास प्राधान्य द्यावे. याबाबत आमच्या मंडळाकडून जनजागृती क रण्यावर भर दिला जात आहे.
- रसिका जानराव, सामाजिक कार्यकर्त्या
सॅनिटरी नॅपकीनचा वापर आवश्यक आहे. नॅपकिन्स जास्त वेळ ठेवल्यास पुरळ उठणे, रॅशेस येणे, अशा समस्या होऊन जंतुसंसर्ग होऊ शकतो. यादरम्यान दररोज आंघोळ, वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची आहे. याबाबत काटकसर, कंटाळा करता कामा नये. मनपा, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्रसाधनगृहांची दयनीय अवस्था आहे. मुबलक पाण्यापासून सर्वच सोयी-सुविधांची वानवा दिसून येते.
- डॉ. माधवी मुठाळ, स्त्री-रोग तज्ज्ञ
मासिकपाळीदरम्यान वैयक्तिक स्वच्छतेविषयी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच चांगला आहारदेखील असणे आवश्यक आहे. अलीकडे जास्त केमिकलचा मारा असलेले सॅनेटरी नॅपकिन बाजारात मिळतात त्यापासून अॅलर्जीचा धोका बहुतांश मुलींना स्त्रियांना होतो. जंतुसंसर्गामुळे गर्भनलिके लाही धोका निर्माण होऊन पुढे वंध्यत्वाची शक्यता बळावते.
- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ