नाशिक-पुणे महामार्गावर खड्ड्यांमुळे वाढते अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:13 AM2018-08-26T00:13:23+5:302018-08-26T00:13:52+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
उपनगर : नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत पावसाच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी व वाहनांची आदळआपट होऊन नुकसान होत आहे. तसेच महामार्ग रस्त्याच्या साइडपट्ट्यांमधील माती, मुरूम वाहून गेल्याने व बसून गेल्याने साइडपट्टी व रस्त्यामध्ये अंतर निर्माण झाले आहे. तसेच साइडपट्ट्यांमध्ये खाचखळगे तयार झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. यामुळे दुचाकी चालकांना साइडपट्ट्यांमधील खड्ड्यांचा व साइडपट्टी-डांबरी रस्त्यामधील खोलगट अंतराचा अंदाज येत नसल्याने गाडी स्लिप होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीतदेखील भर पडत आहे. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासोबत महामार्गाच्या साइडपट्ट्यांमध्ये मुरूम, कच टाकून साइडपट्ट्यांची रस्त्याइतकी लेव्हल करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
पावसामुळे दुरवस्था
नासर्डी पुल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंत पावसाच्या संततधारेमुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, यामुळे वाहतुकीची कोंडी व वाहनांची आदळआपट होऊन नुकसान होत आहे. साइडपट्ट्यांमध्ये खाचखळगे तयार झाल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे.