ड्रीम कॅसल सिग्नलवर वाहनांचे वाढते अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:16 AM2018-07-14T01:16:20+5:302018-07-14T01:16:39+5:30
नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौफुलीवर प्रतिदिन एक तरी छोटा वा मोठा अपघात होत असून, ही चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे़
नाशिक : मखमलाबाद रोडवरील ड्रीम कॅसल चौफुलीवर प्रतिदिन एक तरी छोटा वा मोठा अपघात होत असून, ही चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली आहे़
चौफुलीवरील झेब्रा क्रॉसिंग तसेच पांढरे पट्टे अस्पष्ट झालेले असून, रात्रीच्या वेळी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ या ठिकाणचे बहुतांशी अपघात हे वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे होत असलेले उल्लंघन व वाहनांचा वेग यामुळे झालेले आहेत़ त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे़
ड्रीम कॅसल चौफुलीवर मखमलाबाद गावाकडून पंचवटीत जाणारे, पंचवटीतील मखमलाबाद नाक्याकडून मखमलाबादला जाणारे, चोपडा लॉन्सकडून येणारे तसेच ड्रीम कॅसलजवळील इमारतीकडून वाहनधारक येतात़ सकाळ, दुपार व संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस या ठिकाणी गर्दी असते़ त्यातच सिग्नलला दिलेल्या वेळेतही मोठी तफावत असून, काही बाजूकडील वाहनांना जाण्यासाठी खूपच कमी कालावधी मिळतो़ त्यामुळे पाठीमागील वाहनधारक सिग्नल संपला तरी आपले वाहन दामटत असतात़ तर काही वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़
ड्रीम कॅसल इमारतीजवळ असलेल्या या चौफुलीवरील सिग्नलवर वाहतूक पोलीस हे क्वचितच दृष्टीस पडतात़ दिवसाचा ठरावीक पावत्यांचा कोटा संपला की ते निघून जातात़ मुळात सिग्नल हा स्वयंशिस्तीने पाळण्याची बाब आहे़ मात्र, जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत वाहनचालक सुधारणार नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे किमान महिनाभर तरी या ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त करून वाहनधारकांना शिस्त लावण्याची मागणी केली जाते आहे़