शहराचा वाढता विस्तार, सरसावला यांत्रिकी विभाग
By Suyog.joshi | Published: September 15, 2023 07:00 PM2023-09-15T19:00:53+5:302023-09-15T19:01:17+5:30
शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे.
नाशिक : शहराच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे महापालिकेचा यांत्रिकी विभाग सरसावला असून सहाही विभागात पंचवीस किमीच्या ४१ ठिकाणी मलवाहिका टाकण्यात येणार असून यासाठी २२ कोटी खर्च येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चोहोबाजूंनी नाशिकचे वीस किलोमीटरचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान नव्याने विकसित झालेल्या या भागात सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची असते. त्यानुसार महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून या कामासाठी ४१ निविदा काढल्या असून याच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. नाशिकरोड, सातपूर, पंचवटी, नाशिक पूर्व, नवीन नाशिक व पश्चिम या सहाही विभागात मोठ्या संख्येने इमारती व संकुले उभारली जात असल्याने रहिवाशी भाग वाढला आहे.
२२ कोटींच्या कामांमध्ये ज्या ४१ ठिकाणी मलवाहिकेचे कामे केली जाणार आहे. यामध्ये नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्वाधिक २ कोटी ४९ लाख ९२ हजार ३९७ रुपयांचे काम आहे. याखाली नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १६ येथील आगर टाकळी तील पंचशील नगर, आंबेडकर नगर, राहुल नगर येथील परिसरात मलवाहिका टाकण्यासाठी १ कोटी ९२ लाख ९८ हजार, पंचवटीतील प्रभाग ६ मधील विविध ठिकाणच्या मलवाहिका टाकण्यासाठी १ कोटी ६२ लाख २९ हजार तर नाशिकरोड मधील प्रभाग २२ मध्ये १ कोटी ४९ लाख ६३ हजार एवढा खर्च येणार आहे. वरील आर ठिकाणी दीड कोटी ते दोन कोटी पर्यत मलवाहिका टाकण्याचा खर्च आहे. उर्वरीत ३७ ठिकाणी २४ ते ९९ लाखांचा खर्च येणार आहेत.
ठेकेदारांना २० सप्टेंबरपर्यंत मुदत
नव्याने विकसित झालेल्या या परिसरात मलवाहिका टाकल्यानंतर येणारा ताण कमी होणार आहे. या कामांसाठी ठेकेदारांना २० सप्टेंबर पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी २१ सप्टेंबर रोजी सहाही विभागातील निविदा खूल्या करण्यात येतील.