इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:08 AM2017-10-25T00:08:34+5:302017-10-25T00:08:43+5:30
परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
इंदिरानगर : परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
इंदिरानगर परिसरात नागपूरच्या धर्तीवर लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे वाटत होते, परंतु या रस्त्यालगत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय सुरू झाल्याने कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, साईनाथनगर, विनयनगर, परबनगर, सार्थकनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु या रस्त्यालगतच अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर पत्र्यांचे शेड बांधून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यामध्ये अमृतवर्षा कॉलनीसमोर सुमारे पंधरा ते वीस पत्राच्या शेडमध्ये विविध व्यवसाय आहेत तसेच श्रद्धा विहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शंभरफुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूस, पेठेनगर रस्त्यावरील संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर या रस्त्यावरही सुमारे सात आठ पत्र्याचे शेड बांधून विविध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय करणाºयांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यालगत अनधिकृत पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय थाटणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेचे दुर्लक्ष
आतापर्यंत अनेक वेळा अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे, तसेच सदर पत्र्याच्या शेडमधील दुकाने भर लोकवस्तीत असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या शेडमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय असल्याने पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.