बनावट महिला ग्राहकांचा वाढता उपद्रव; दालनांमध्ये दागिण्यांवर हात साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:01 PM2019-04-14T17:01:48+5:302019-04-14T17:11:23+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले
नाशिक : सध्य लग्नसराईचा काळ सुरू असल्यामुळे सराफी व्यावसायिकांकडेही ग्राहकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत काही महिला चोर बनावट ग्राहक म्हणून दालनात जाऊन दागिणे खरेदीच्या बहाण्याने हात साफ करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सराफ बाजारात एका व्यावसायिकाच्या दालनात अशाच पध्दतीने सोन्याचे दागिणे चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पंधरा दिवसांत ही तीसरी घटना समोर आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील एका सराफाच्या दुकानात बुरखाधारी दोन महिला बनावट ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी सोन्याचे दागिणे सेल्समनकडून बघून घेतले. बुधवारी (दि.१०) सायंकाळी या बनावट महिला ग्राहकांनी हातचलाखीने १८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दोन झुबे हातोहात लंपास केल्याची फिर्याद सेल्समन पुंडलिक पवार यांनी दिली आहे. दोन महिलांपैकी एकीने पवार यांच्याशी सतत संवाद साधत विविध प्रकारची माहिती जाणून घेण्याचा बनाव करत दिशाभूल केली तर त्या महिलेची दुसरी साथीदार महिला चोराने झुबे गायब केले.
सराफी दालनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनदेखील सर्रासपणे बनावट महिला ग्राहकांकडून सोन्याचे दागिणे लंपास करण्याच्या घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आठवडाभरापुर्वीच कॉलेजरोडवरील दोन सराफाच्या दुकानातून अशाच पध्दतीने यापुर्वीदेखील गुन्हे घडले आहेत. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण होत नाही तोच पुन्हा तीसरा गुन्हा घडल्याने सरकारवाडा गुन्हे शोध पथकापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.