वाढती रुग्णसंख्या : साथीच्या आजारांनी वडाळावासीय त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:02 PM2018-08-08T16:02:38+5:302018-08-08T16:06:02+5:30

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शहरी आरोग्य विकास विभागासह महापालिकेच्या आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. वडाळागावात प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण थंडी-ताप, अंगदुखी, सांधेदुखीचा आढळून येतो तरीदेखील गावामध्ये साथीचे आजार पसरले नसल्याचे संंबंधितांकडून सांगितले जाते.

Increasing patient numbers: Wadala residents suffer from pandemic diseases | वाढती रुग्णसंख्या : साथीच्या आजारांनी वडाळावासीय त्रस्त

वाढती रुग्णसंख्या : साथीच्या आजारांनी वडाळावासीय त्रस्त

Next
ठळक मुद्देझाकीर हुसेन रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणीच्या आकडेवारीमुळे हा दावा फोल दोन महिन्यांपासून गावाचे आरोग्य बिघडलेले

नाशिक : वडाळागाव हे महापालिका हद्दीत असून नसल्यासारखे झाले आहे. आरोग्य सभापतींच्या शेजारच्या प्रभागात गावाचा समावेश होत असला तरी येथील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे चित्र दिसते. लोकप्रतिनिधींकडून गावात साथीचे आजार नसल्याचा दावा जरी केला जात असला तरी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणीच्या आकडेवारीमुळे हा दावा फोल ठरतो. बुधवारी (दि.८) २४० नव्या रुग्णांपैकी १२५ रुग्ण वडाळागाव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले.
वडाळागाव परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शहरी आरोग्य विकास विभागासह महापालिकेच्या आरोग्य विभागाला शक्य झालेले नाही. वडाळागावात प्रत्येक घरामध्ये एक तरी रुग्ण थंडी-ताप, अंगदुखी, सांधेदुखीचा आढळून येतो तरीदेखील गावामध्ये साथीचे आजार पसरले नसल्याचे संंबंधितांकडून सांगितले जाते. आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम, भुयारी गटार विभागाचा गलथान कारभार याला जबाबदार असताना लोकप्रतिनिधींनीकडून प्रशासनाला धारेवर धरण्याऐवजी त्यांचा गलथानपणा पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतो, हे दुर्दैव आहे.
वडाळागावामधील अंतर्गत रस्त्यांचे २००८ नंतर कधीही डांबरीकरण होऊ शकले नाही. येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था थांबलेली नाही. भूमिगत गटारी आजही चौहोबाजूंनी रस्त्यांवर वाहतात. उघड्या गटारींवरील ढापे जैसे थे आहेत. त्या गटारी कायमस्वरूपी भूमिगत होऊ शकलेल्या नाहीत. गावातील भाजीबाजाराचा प्रश्न सुटलेला नाही. मुख्य रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही, गावात शहर बससेवाही सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे हे गाव एखाद्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील आहे की काय? अशी शंका येते. येथील नागरिक नियमितपणे महापालिका प्रशासनाला घरपट्टी, पाणीपट्टीच्या स्वरूपाने सर्व कर भरतात. मात्र त्यांना पथदीप, पाणी याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका आयुक्तांनी गावाचा दौरा करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

दोन महिन्यांपासून गावाचे आरोग्य बिघडलेले
जून महिन्यापासून वडाळागाव परिसराचे संपूर्ण ‘आरोग्य’ बिघडलेले आहे. गावातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याऐवजी वाढत असल्याने आश्चर्यासह संतापही व्यक्त होत आहे. गावातील रहिवाशांच्या घरात डासांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे.

Web Title: Increasing patient numbers: Wadala residents suffer from pandemic diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.