गोदापात्रात वाहने धुतल्यामुळे वाढते प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:19 AM2018-08-27T00:19:13+5:302018-08-27T00:19:35+5:30
गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते,
पंचवटी : गोदावरी नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात कपडे धुणे तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहने धुणे व नदीपात्र प्रदूषित करणाऱ्यावर कारवाई केली जाते, असे वारंवार प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र सध्या प्रशासनाचेच दुर्लक्ष झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात दुचाकी चारचाकी वाहने धुणाºयांची गर्दी होत असल्याने गोदावरी नदीला सर्व्हिस स्टेशनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे काहीकाळ पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रविवारी गोदावरी नदीचे पाणी कमी झाल्यानंतर नागरिकांनी थेट नदीपात्र गाठून दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नदीत वाहने धुऊन नदीपात्र प्रदूषित करणाºयावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात येत होते. तसेच नदीपात्र परिसर स्वच्छ राहावा यासाठी पोलीस गस्त वाढविली होती, मात्र गस्तीवरील पोलीस व प्रशासनाचे पथक यांचे पुन्हा दुर्लक्ष होत असल्याने सध्या तरी गोदावरी नदीत धुणी भांडी यासह वाहने धुण्याचा प्रकार सर्रासपणे चालू असल्याचे चित्र दिसून येते. याबाबत महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.