‘कॅशलेस’साठी केंद्रांवर वाढता दबाव
By admin | Published: April 8, 2017 01:00 AM2017-04-08T01:00:03+5:302017-04-08T01:00:47+5:30
नाशिक : शासनाचे विविध प्रकारचे दाखले तयार करून ते वितरित करणाऱ्या महा - ई - सेवा केंद्रचालकांना ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी महाआॅनलाइनने सक्ती केली आहे.
नाशिक : शासनाचे विविध प्रकारचे दाखले तयार करून ते वितरित करणाऱ्या महा - ई - सेवा केंद्रचालकांना ‘कॅशलेस’ व्यवहारासाठी महाआॅनलाइनने सक्ती केली असून, महिन्यातून किमान वीस नागरिकांकडून स्वाइप मशीनने दाखल्यांचे पैसे स्वीकारावेत अन्यथा केंद्र बंद करण्याची धमकी देण्यात आल्याने सेवा केंद्रचालक अडचणीत सापडले आहेत. तुटपुंजी रक्कमेसाठी नागरिक क्रेडीट कार्ड वापरण्यास नकार देत असल्याने त्यांची मनधरणी करण्याची वेळ केंद्रचालकांवर आली आहे.
डिजिटल महाराष्ट्र पूर्तीसाठी महाआॅनलाइनची मदत शासनाने घेतली असून, नोटाबंदीनंतर अधिकाधिक नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करावेत यासाठी महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आता नागरिकांनाही वेठीस धरण्यास सुरुवात झाली आहे. महाआॅनलाइनने राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्रचालकांना याबाबतचे तोंडी आदेश दिले आहेत.
राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे तसेच शासनाचे विविध प्रकारचे दाखले वेळेत व नागरिकांना त्यांच्या घरपोच देण्यासाठी शासनाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी महा-ई-सेवा केंद्रे गावोगावी सुरू केले आहेत.
या केंद्रांना शासनाच्या महाआॅनलाइनने जोडण्यात आले असून, केंद्रचालकांनी महाआॅनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुविधा नाममात्र शुल्क घेऊन पुरवाव्यात, असे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्यासाठी मात्र सारी गुंतवणूक केंद्रचालकांनी करावयाची असून, केंद्रासाठी जागा, वीजबिल, संगणक, इंटरनेट, कर्मचारी वेतन या सुविधा निर्माण कराव्या लागल्या आहेत. विशेष करून उत्पन्नाचे दाखले, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्व, वय व अधिवास यासारखे दाखले त्याचबरोबर ग्रामीण भागात वीज देयके स्वीकारण्याची मुभाही केंद्रचालकांना देण्यात आले आहेत. गावातील नागरिकांना गावातच या केंद्रांच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या या केंद्रचालकांना मात्र डिजिटल महाराष्ट्र व कॅशलेस व्यवहारासाठी आता सक्ती करण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)