नाशिक महापालिकेत अधिका-यांवर स्वेच्छानिवृत्तीचा वाढता दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 06:44 PM2017-12-07T18:44:21+5:302017-12-07T18:45:35+5:30
म्युनिसिपल कर्मचारी सेनेचा आरोप : काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा
नाशिक - महापालिकेत अधिका-यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत असून आऊटसोर्सिंगच्या नावाखाली संपूर्ण महापालिकाच ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी केला आहे. दरम्यान, कर्मचारी व अधिका-यांना देण्यात येणा-या अपमानास्पद वागणुकीबाबत आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही तिदमे यांनी दिला आहे.
म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेच्या कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात कर्मचारी व अधिका-यांवर सत्ताधारी पदाधिका-यांकडून होत असलेल्या अन्यायाबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रवीण तिदमे यांनी सांगितले, नाशिक महानगरपालिकेत आधीच रिक्तपदे मोठी आहेत, त्यात दरमहा सेवानिवृत्ती होत आहे. अधिकारी आणि कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने ते अतिरिक्त कामाचा बोजा घेऊन काम करत असतात. मात्र, पालिकेत सध्या अधिका-यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढत आहे. पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसतांना विषय समित्या, त्यांचे सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नागरीक अश्या विविध पातळीवर प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अधिकारी आणि कामगार वर्गाला शक्य होणार नाही. संपूर्ण नाशिक महानगरपालिकाच आउटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारांच्या ताब्यात देण्यासाठीच अधिका-यांवर स्वेच्छा निवृत्तीचा दबाव वाढविण्यात येत आहे. दोन वर्षांत तब्बल ११ अधिका-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. मनपा आयुक्तांनी याप्रकरणी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना अधिका-यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही तिदमे यांनी दिला आहे. महापालिका ठेकेदारांच्या घश्यात घालण्यापेक्षा राज्यातही सत्ता असणा-या पदाधिका-यांनी पालिकेत नोकर भरतीसाठी विशेषबाब म्हणून मंजुरी मिळवून आणावी. त्यातून अनेकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होऊन अनेक बेरोजगारांचे शुभाशिर्वाद लाभतील. कुणाला नोकरी सोडण्यास लावण्यापेक्षा कुणाला रोजगार देता येतो काय, याचा विचार अधिक व्हावा, असा टोलाही तिदमे यांनी लगावला आहे.
संघटनेचे आवाहन
म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना ही कायम नाशिक महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या पाठीशी असून अधिकारी आणि कर्मचा-यांनी कुणाच्याही दबावाला बळी पडून स्वेच्छा निवृत्ती घेऊ नये. मनपातील उच्च अधिकारी असो कि कर्मचारी, ज्याच्यावरही कुणी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.