शाडूमूर्तीला वाढता प्रतिसाद; हरितालिकेची लगबग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:44+5:302021-09-09T04:19:44+5:30

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शहरातील बहुतांश मूर्ती विक्री दालनांमध्ये बुधवारी नागरिकांची गर्दी होती. निम्म्याहून अधिक नागरिकांकडून ...

Increasing response to shadumurti; Almost green! | शाडूमूर्तीला वाढता प्रतिसाद; हरितालिकेची लगबग !

शाडूमूर्तीला वाढता प्रतिसाद; हरितालिकेची लगबग !

Next

नाशिक : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने शहरातील बहुतांश मूर्ती विक्री दालनांमध्ये बुधवारी नागरिकांची गर्दी होती. निम्म्याहून अधिक नागरिकांकडून यंदा गणरायाच्या शाडूमातीच्या मूर्तीलाच प्राधान्य दिले जात आहे. मूर्तीच्या आकारापेक्षा तिच्या सुबकपणाला तसेच आकर्षक रंगसंगतीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून आले. सलग दुसऱ्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असूनही नागरिकांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, बुधवारी गणरायाच्या नोंदणीबरोबरच महिला वर्गाकडून हिरतालिका पूजनासाठी पत्री, फुले खरेदीला प्राधान्य दिले जात होते.

शुक्रवारी (दि.१०) घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध शोभेच्या वस्तूंनी गजबजली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे नागरिक पर्यावरणूरक गणेशमूर्तींना पसंती देत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नियमावलीदेखील जाहीर केली आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणानिमित्त बाजारात खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत आहे. रंगबिरंगी फुले, फुलांच्या माळा, लाइटच्या वेगवेगळ्या माळा, मुकुट, मंगळागौर सजावटीच्या विविध वस्तू यांनी बाजारपेठ सजली आहे. सजावटीच्या वस्तू, पूजेच्या साहित्याचे स्टॉलची दुकाने व अर्थातच गणेशमूर्ती दालनांमध्ये नागरिकांची पसंतीसाठीची लगबग दिसत आहे.

इन्फो

गतवर्षीपेक्षा अधिक उत्साह

गतवर्षी पहिल्या लाटेत कोरोना अगदी ऐन बहरात असताना गणेशोत्सव आल्याने कोरोनाची धास्ती अधिक होती. त्या तुलनेत यंदा कोरोनाचा बहर बराचसा कमी झालेला असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात गतवर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी उत्साह दिसून येत आहे. बहुतांश नागरिकांकडून गर्दीच्या ठिकाणी मास्कची दक्षता बाळगली जात असल्याचे दिसत आहे.

इन्फो

गणेशोत्सवाच्या उत्साहाने भीतीवर मात

कोरोनाच्या भीतीवर गणेशोत्सवाच्या उत्साहाने सध्या मात केली आहे. कपड्यांची दुकाने, पूजेच्या साहित्याची दुकाने, मिठाईची दुकाने, घराच्या रंगणकाम साहित्यासोबतच आरास व शोभेच्या वस्तूंची, पूजा साहित्याची दुकाने सजली असून, ग्राहकांचीदेखील साहित्य घेण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र यंदाही कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून आवाहनदेखील करण्यात येत आहे.

Web Title: Increasing response to shadumurti; Almost green!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.