ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढतोय फायब्रोसिसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:11 AM2020-12-23T04:11:48+5:302020-12-23T04:11:48+5:30
नाशिक : जिल्ह्यात नागरिक कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी कोविडपश्चात होणाऱ्या त्रासाच्या प्रमाणातही काहीशी वाढ होत आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात नागरिक कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत असली तरी कोविडपश्चात होणाऱ्या त्रासाच्या प्रमाणातही काहीशी वाढ होत आहे. विशेषत: कोरोनामुक्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना फुप्फुसांचे आजार म्हणजेच फायब्रोसिसचा त्रास होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोना संसर्ग वाढत असताना राज्य शासनाच्या आदेशानुसार कोमाॅर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात अन्य जिल्ह्यांप्रमाणेच कोरोनाबाधितांच्या संख्येत कोमॉर्बिड आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कोरोनामुक्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळेच फायब्रोसिस होण्याच्या प्रमाणातही गत महिनाभरापासून वाढ झाल्याचे आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा रुग्णालय तसेच बिटको रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटरदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यात दररोज किमान ८ ते १० पोस्ट कोविड रुग्ण येत आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होणे, वारंवार दम लागणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा अशा समस्या दिसून येत आहेत. फुप्फुसांच्या या समस्येलाच फायब्रोसिस म्हणून ओळखले जाते. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर धोका पूर्णपणे टळल्याच्या भ्रमात कुणीही राहू नये, असेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
ज्येष्ठांनी घ्यावी अधिक काळजी
जे रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तसेच ज्यांचे वय साठीपेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांनी सुरुवातीचे चार महिने काळजी घ्यायला हवी. त्यांनी डॉक्टारांनी सांगितलेले व्यायामदेखील करणे अत्यावश्यक आहे, तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार, यकृतविकार यांसारख्या जुन्या व्याधींनी ग्रस्त असलेले कोमॉर्बिड रुग्णांनी त्यांच्या नियमित गोळ्यांबरोबरच डाक्टरांनी दिलेल्या निर्देशानुसार औषधोपचार सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे.
इन्फो..
थकव्याचा आणि श्वसनाचा त्रास
जे रुग्ण पोस्ट कोविड सेंटरमध्ये येत आहेत, त्यांना प्रामुख्याने थकव्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढल्याने श्वसनाचे त्रास होण्याचे प्रमाण अधिक वेगात वाढू लागले आहे. ज्यांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झाली आहे, त्यांना अधिक दीर्घ श्वसन करावे लागण्याचे प्रकारदेखील आढळत आहेत.