राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भामट्यांचा सुळसुळाट

By admin | Published: February 21, 2016 11:02 PM2016-02-21T23:02:21+5:302016-02-21T23:04:55+5:30

कागदी नोटांद्वारे फसवणूक : पैसे सांभाळण्याच्या नावाखाली गंडा, पंधरवड्यात दुसरी घटना

Inculcate busts in nationalized banks | राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भामट्यांचा सुळसुळाट

राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भामट्यांचा सुळसुळाट

Next

 नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांसोबत संवाद साधून स्वत:जवळील रुमालात बांधलेले नकली पैसे (कागदी नोटा) सांभाळणे वा बँकेत भरण्याच्या नावाखाली देऊन ग्राहकाकडील रक्कम लंपास करणाऱ्या भामट्यांचा शहरात सुळसुळाट झाला आहे़ प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांसोबत पंधरवड्यातील ही दुसरी घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़
केतकीनगरमधील रहिवासी जितेश भोये हा युवक मंगळवारी (दि़१६) दुपारच्या सुमारास दिंडोरी रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मेरी शाखेत मामाच्या घराचा हप्ता भरण्यासाठी गेला होता़ बँकेत असलेल्या दोन संशयितांनी त्याच्यासोबत संवाद साधून विश्वास संपादन केला़ या दोघांनी भोये याला रुमालात एक लाख रुपये असल्याचे सांगून हे पैसे बँकेत भरण्यासाठी दिले व त्याच्याकडील १३ हजार रुपये घेऊन निघून गेले़ यानंतर काही वेळाने शंका आल्याने भोयेने रुमाल उघडून बघितले असता त्यामध्ये कागदाचे बंडल आढळून आले़ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जितेश भोये याने म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून या दोघा संशयितांविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़
पंचवटीत इंद्रकुंडावरील बँक आॅफ इंडियाच्या शाखेत ४ फेब्रुवारीला फसवणुकीची अशीच घटना घडली होती़ मखमलाबादच्या माळी गल्लीतील सोमनाथ भांगरे हे दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास पैसे भरण्यासाठी गेले होते़ तिथे असलेल्या संशयिताने ‘लाल रुमालामध्ये बांधलेले आमचे एक लाख रुपये तुमच्याकडे राहू द्या आणि तुमच्याजवळील पैसे आमच्याकडे द्या’, असे सांगितले व भांगरे यांच्याकडील १५ हजार ५०० रुपये घेऊन निघून गेले़ संशयित तिथून गेल्यानंतर या रुमालातील नोटांची पाहणी केली असता त्यामध्ये कागदाचे बंडल निघाले़ याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़
बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणारी टोळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही़ विशेष म्हणजे राष्ट्रीयीकृत बँकेत फसवणुकीची पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे़ संशयित बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत़; मात्र पंचवटीतील घटनेत बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले गेले नसल्याने या संशयितांचा शोध लागला नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Inculcate busts in nationalized banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.