अपक्ष उमेदवारांची ‘पतंग कटली’
By admin | Published: February 8, 2017 10:03 PM2017-02-08T22:03:47+5:302017-02-08T22:03:47+5:30
निवडणूक चिन्ह वाटपात अनेक अपक्ष उमेदवारांची चांगलीच फजिती झाली.
नाशिक : निवडणूक चिन्ह वाटपात अनेक अपक्ष उमेदवारांची चांगलीच फजिती झाली. काहींना चिन्हांची मागणी करूनही अपेक्षित चिन्ह मिळाले नाही तर काही अपक्षांनी चिन्हाची मागणीच नोंदविली नव्हती. सर्वाधिक अपक्षांनी पतंग या निवडणूक चिन्हाला प्रथम प्राधान्य दिले होते. परंतु सदर चिन्ह एमआयएम या पक्षासाठी राखीव असल्याने पतंगाच्या अपेक्षेवर बसलेल्या उमेदवारांची ‘पतंग कटली’ आणि त्यांना उर्वरित निवडणूक चिन्हातून चिन्ह निवडावे लागले.
उपक्ष उमेदवार शक्यतो पतंग, कप-बशी, नारळ, फळा, बॅट, शिलाई मशीन आणि दूरदर्शन संच या मुक्त चिन्हांची मागणी नोंदवित असतात. त्यानुसार पतंग या चिन्हाची सर्वाधिक पसंती अपक्ष उमेदवारांनी केली होती. परंतु सदर चिन्ह हे एमआयएम या पक्षासाठी राखीव असल्याने असंख्य उमेदवारांना पतंग चिन्ह सोडून द्यावे लागले. त्या खालोखाल कप-बशी हे चिन्ह अनेकांना मिळाले. उरलेल्या चिन्हांमध्ये बॅट, नारळ आणि शिलाई मशीनला प्राधान्य मिळाले.
नाशिकरोड परिसरात अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणात मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवार राहिले आहेत. या उमेदवारांना आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हांचे वाटप केले. अपक्ष उमेदवारांना पक्ष चिन्हांची मागणीही नोंदवावी लागते. परंतु काही उमेदवारांनी अशा प्रकारची नोंदणीच केली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर उर्वरित चिन्हातून चिन्ह निवडीची संधी देण्यात आली.
सर्वांत अडचणीची बाब पक्षीय उमेदवारांच्या बाबतीत घडली. काही उमेदवारांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांच्या अर्जावर पक्ष चिन्हाची नोंद आपसुकच झाली होती. परंतु छाननीत अशा अनेक उमेदवारांचे बी अर्ज नसल्याने त्यांचे अर्ज अपक्ष ठरले. त्यामुळे काहीकाळ पक्षीय चिन्हाच्या अपेक्षेवर असलेल्या उमेदवारांना नंतर इतर निवडणूक चिन्ह निवडावे लागले. त्यामुळे ऐनवेळी चिन्ह निवड करताना त्यांची धावाधाव झाली. कोणते चिन्ह निवडावे याबाबत निवडणूक कक्ष कार्यालयातच खलबते सुरू होती.