कोरोना वैद्यकीय व्यवस्थापनासाठी स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ; ॲक्शन प्लान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 03:38 PM2020-06-20T15:38:51+5:302020-06-20T15:42:29+5:30
कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग व आरोग्य सेवांच्या संचलन व सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तयार केला जाणार आहे.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर कार्यान्वित करण्यात येत असून सर्व यंत्रणांच्या समन्वयातून साकारलेल्या या सेंटरच्या माध्यमातून कोरोना संसर्ग
व आरोग्य सेवांच्या संचलन व सनियंत्रणाबरोबरच त्यासाठीचा ॲक्शन प्लान तयार केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
यासंदर्भात आज जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य यंत्रणांमधील अधिकारी व डॉक्टर्स यांची एक बैठक आयोजित करून त्यांच्या सूचना विचारात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
आजपर्यंत कोरोना व्यवस्थापनात आपल्या जिल्ह्यात झालेले कामकाज, सांख्यिकी माहिती व्यवस्थितरित्या पोर्टलवर भरली जाणे, कोरोना व्यवस्थापनाचे जे विशिष्ट घटक आहेत त्यांचा आढावा घेवून त्याची जबाबदारी काही अधिकाऱ्यांवर कशा प्रकारे देता येईल, जेणेकरून त्यांना त्याचा आवाका येईल व ते त्यांचे काम व्यवस्थितरित्या करू शकतील. तसेच या सर्वांवर नियंत्रणासाठीची व्यवस्था कशा प्रकारची असेल यासाठीच्या अनेक विषयांचा आज आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी प्रभावीरित्या करणे. त्यात जे हॉस्पिटल या जनआरोग्य योजनेशी संबंधीत आहेत ते कोविड हॉस्पिटलमध्ये समाविष्ट करणे. कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित केलेल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करणे. तसेच आयसीयुचे व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, त्यात वरिष्ठ अनुभवी डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हाट्स ॲप ग्रुप, ऑडियो कॉल्सच्या माध्यमातून चर्चा सतत चालू ठेवणे व पोर्टलवर वेळेत सतत माहिती भरणे, त्यासाठी विशिष्ट लोकांवर ती जबाबदारी सोपवणे आणि मॅसेजेसच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. लॅबरोटरीमधून 24 तासाच्या आत अहवाल मिळतील व तीनही लॅबला योग्य प्रमाणात सॅंपल्स पाठवले. तसेच तेथून वेळेत रिपोर्ट प्राप्त करून जलद गतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जुन्या बैठकांमधील झालेल्या निर्णयांचे पूर्तता अहवाल वेळेत प्राप्त करून घेणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी आजाराच्या हताळणीबाबत ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने आजाराची हाताळणी, त्याचे व्यवस्थापन, औषोधोपचार या सर्वांची अंमलबजावणी होते का नाही याबातही सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करण्याची गरज आहे. खाजगी रुग्णालयांचा वापर आता कोविडच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे. त्या नियमित रुग्णालयांवरती निगराणी ठेवण्यात यावी. तेथील पेशंटला उपचारासाठीचे दर वाजवी आकारले जात आहेत का, त्याला उपचार योग्य पद्धतीने दिले जात आहेत किंवा कसे याची नियमितपणे पाहणी करणे, त्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्यावर देखील तक्रार नियंत्रणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पेशंटच्या मॅनेजमेंटच्या दृष्टिने तो योग्य ठिकाणीच म्हणजे सीसीसी, डीएचसी, तसेच आवश्यकता असेल तरच हॉस्पिटमध्ये त्याला पाठवण्यासाठी वेळेवर निर्णय घेणे व त्याप्रमाणे त्या ठिकाणीच तो पेशंट जाईल याची काळजी घेण्याच्या व त्यासठीचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. कैलास भोये, साथ रोग अधिकारी डॉ.उदय बर्वे, डॉ. राहुल हडपे, वैद्यकिय अधिकारी डॉ.निलेश जेजुरकर, डॉ. सचिन पवार, डॉ. प्रदिप वाघ, डॉ. उत्कर्ष दुधडिया, डॉ. राठोड यावेळी उपस्थित होते.