भारताला मिळाले 33 नवे लढाऊ वैमानिक; 'कॅट्स'च्या 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात
By अझहर शेख | Published: November 29, 2023 09:50 PM2023-11-29T21:50:01+5:302023-11-29T21:50:33+5:30
३ नवे वैमानिक भारतीय सैन्यदलाला मिळाले आहेत.
नाशिक: कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रशिक्षणार्थी लढाऊ वैमानिकांच्या ४०व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षान्त सोहळा बुधवारी (दि.२९) लष्करी थाटात पार पडला. ३३ नवे वैमानिक भारतीय सैन्यदलाला मिळाले आहेत.
मागील वीस वर्षांपासून या संस्थेकडून लढाऊ वैमानिक घडविले जात आहे. काळासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर कॅट्सने प्रगतिशील घोडदौड सुरूच ठेवली आहे. या प्रशिक्षण संस्थेतून खडतर असे शास्त्रशुद्ध लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणासह एव्हिएशन हेलिकॉफ्टर इन्स्ट्रक्टर्स अभ्यासक्रमासह बेसिक रिमोट पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टिमचे (आरपीएएस) प्रशिक्षण देण्यात आले. एकूण ४९ प्रशिक्षणार्थींचा ४०व्या तुकडीत समावेश होता. त्यापैकी ३३ लढाऊ वैमानिक, ४ लढाऊ हेलिकॉप्टर प्रशिक्षक आणि १२ अधिकाऱ्यांना आरपीएएस वैमानिक म्हणून अनुक्रमे ‘एव्हिएशन विंग्स’, ‘बॅच’, ‘विंग्स’ आर्मी एव्हिएशन कोरचे महानिर्देशक तथा कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रशिक्षणार्थींमध्ये नायजेरीयन सैन्यदलातील लेफ्टनंट ए.ए ऑग्नुलिये यांचाही समावेश होता. यावेळी त्यांनाही विंग्स व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
सोहळ्याला सकाळी पावणेनऊ वाजता सैनिकी बॅण्ड पथकाच्या ‘कदम कदम बढायें जा...’ या गीताच्या धुनवर प्रशिक्षणार्थींच्या तुकडीने दिमाखदार संचलन सादर करत उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना ‘सॅल्युट’ केला. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना विंग्स व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यानंतर प्रशिक्षण कालावधीत वेगवेगळ्या विषयांत प्रावीण्य मिळविणाऱ्या उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी वैमानिकांना विविध ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
...हे ठरले उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी
उत्कृष्ट हेलिकॉप्टर प्रशिक्षक म्हणून मेजर आकाश मल्होत्रा यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी’ , उत्कृष्ट आरपीएस पायलट म्हणून मेजर दिवाकर शर्मा यांना ‘बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट ट्रॉफी आणि मेजर निरंजन जोशी यांना गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच आरपीएएस पर्यवेक्षक मेरिटमध्येसुद्धा जोशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. कॅप्टन मोहितसिंग निहाल यांना एस. के. शर्मा स्मृतिचिन्ह, तर कॅप्टन दिवेश जोशी यांना पी.के. गौर स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच भारतीय नौदलाचे प्रशिक्षणार्थी वैमानिक लेफ्टनंट कमांडर अमित सिंह यांनी तीन ट्रॉफींवर आपले नाव कोरले.
‘सिल्व्हर चित्ता’च्या मानकरी ठरल्या कॅप्टन हंसजा शर्मा
प्रशिक्षण कालावधीत अष्टपैलू कामगिरीसाठी दिली जाणारी ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक कॅप्टन हँसजा रश्मी शर्मा यांनी पटकाविली. या तुकडीतून शर्मा यांच्यासह कॅप्टन श्रद्धा शिवडवकर यांनीही यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले. या दोन महिला प्रशिक्षणार्थी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले.