इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८ : नाशिकच्या इको-रिसॉर्टमध्ये भरला शेतकरी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:59 PM2018-03-10T13:59:57+5:302018-03-10T13:59:57+5:30
या बाजारामध्ये शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नाशिक : महाराष्ट पर्यटन विकास महामंडळ व नाशिक व्हॅली वाईन क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून (दि.९) ‘इंडिया ग्रेप हार्वेस्ट-२०१८’ सुरू आहे. येत्या रविवारी (दि.११) ग्रेप हार्वेस्टचा समारोप होणार आहे. अखेरच्या टप्प्यात अंजनेरी रस्त्यावरील एका ग्रेप काउण्टी इको-रिसॉर्टमध्ये ‘शेतकरी बाजार’ भरविण्यात आला आहे. याअंतर्गत सुमारे चाळीस स्टॉल्स् शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नाशिक ही देशाची ‘वाईन कॅपिटल’म्हणून ओळखली जाते. भारतातील एकूण वाइनरींच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक २३ वाइनरी नाशिक जिल्ह्यात सध्या सुरू आहे. नाशिकमध्ये होणारे दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन हे यामागील प्रमुख कारण आहे.
नाशिकच्या वाईनला जागतिक दर्जाचे मानांकन प्राप्त झाले आहे. वाईनच्या रुपाने नाशिकची नवी ओळख जगाच्या नकाशावर तयार होत आहे. या अनुषंगाने नाशिकच्या द्राक्षांपासून तयार होणारी व्हाईट, रेड वाईन, बेदाणे, द्राक्षशेती, वाईन उद्योगासह वाईन पर्यटन, कृषी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने आणि ‘नाशिक व्हॅली अम्ब्रेला ब्रॅन्ड’च्या प्रमोशनासाठी इंडिया ग्रेप हार्वेस्टची संकल्पना पर्यटन विकास महामंडळ नाशिक विभाग व व्हॅली वाईन क्लस्टरच्या वतीने राबविली जात आहे. याअंतर्गत तीन दिवसीय शेतकरी बाजार थेट इको-रिसॉर्टमध्ये भरविला गेला आहे. दरम्यान, या बाजारात दर्जेदार शेतमाल व शेतमालापासून तयार केलेल्या वस्तू विक्रीचे व्यासपिठ शेतकºयांना मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या बाजारामध्ये शेतक-यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध गझलांची सुगम संगीताची मैफलीचाही आनंद यावेळी आलेल्या नाशिककरांनी लुटला. दरम्यान, या महोत्सवांतर्गत सुरगाणा तालुक्यातील शेतमजूर- द्राक्षबाग कामाारांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवादरम्यान घेण्यात आला.