"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश"
By अझहर शेख | Published: March 18, 2023 05:08 PM2023-03-18T17:08:39+5:302023-03-18T17:09:38+5:30
नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले.
नाशिक : भारतीय संरक्षण दलाला भासणारी लढाऊ साधनसामग्री परदेशांकडून आयात करावी लागत होती; मात्र मागील सहा ते सात वर्षांपासून भारत देश हा ‘मेक इन इंडिया’अंतर्गत आत्मनिर्भरतेवर भर देत आहे. यामुळे बोफोर्सपेक्षाही जास्त शक्तिशाली अत्याधुनिक ‘धनुष्य’सारखी स्वदेशी तोफेची निर्मिती भारताने केली. आता यासारख्या लष्करी साधनसामग्री अन्य देशांना भारत निर्यात करणारा देश बनत आहे, असे प्रतिपादन भारताचे रस्ते व महामार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
निमित्त होते, येथील नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर, तोफखाना केंद्राचे ब्रिगेडियर ए. रागेश, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गडकरी म्हणाले, अशाप्रकारचे लष्करी शस्त्रास्त्र प्रदर्शन भारताच्या युवा पिढीला सैन्यदलात करिअर करण्यासांठी प्रेरणा देणारे ठरते. नाशिक शहर हे विविध लष्करी तळांसाठीदेखील देशभरात प्रसिद्ध आहे. नागपूरप्रमाणेच नाशिकमध्येसुद्धा संरक्षण खात्याच्या साधनसामग्री निर्मितीला भविष्यात वाव आहे. त्यादृष्टीने सरकार नक्कीच प्रयत्नशील राहणार आहे. मेक इन इंडियामुळे देशातील कौशल्यधिष्ठित सुशिक्षित युवकांच्या बुद्धिमत्तेचा फायदा सरकारकडून करून घेतला जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे.
प्रास्ताविकमधून लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर म्हणाले, महाराष्ट्र ही वीरांची भूमी राहिली आहे. या भूमीने देशाला नेहमीच शूरवीर योद्धे दिले आहे. भारतीय सैन्यात मराठा वीरांची वेगळी ख्याती आहे. नाशिकचे तोफखाना केंद्र व स्कूल ऑफ आर्टिलरी हे आशियामधील सर्वांत मोठे व महत्वाचे लष्करी केंद्र आहे. या ठिकाणी साडेपाच हजार अग्निवीरांना प्रशिक्षण दिले जात आहे. खासदार गोडसे यांनीही यावेळी कार्यक्रमाचा उद्देश व संकल्पना मनोगतातून सांगितली.अय्यर यांच्या हस्ते लष्करी मानचिन्ह देऊन नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.