भारत कधीही सहिष्णू नव्हता

By admin | Published: December 15, 2015 11:32 PM2015-12-15T23:32:42+5:302015-12-15T23:40:38+5:30

रावसाहेब कसबे : प्रबोधन परिषद

India was never tolerant | भारत कधीही सहिष्णू नव्हता

भारत कधीही सहिष्णू नव्हता

Next

सटाणा : भारत कधीही सहिष्णू नव्हता. या देशात असहिष्णुतेचे वातावरण हे वैदिक काळापासून चालत आलेले आहे. केवळ बौद्ध काळात असहिष्णुता आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र सहिष्णुता पूर्णपणे प्रस्थापित झाली नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.
समाजप्रबोधन संस्थेतर्फे सोमवारी येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित तिसऱ्या एकदिवसीय प्रबोधन परिषदेत ते बोलत होते. या परिषेदेत कसबे यांना कवी यशवंत मनोहर यांच्या हस्ते ‘प्रबोधन मित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी कसबे यांनी नवोदित लेखकांना कोणत्याही व्यक्तीच्या आहारी न जाता स्वत:चे मत व्यक्त करण्याचा संदेश दिला. तसेच स्वत:चे आकलन, निष्कर्ष निर्भीडपणे मांडावे, पर्यावरण आणि त्याची गुंतागुंत जो चांगल्या पद्धतीने समजून घेईल त्यालाच उत्कृष्ट अशी साहित्य निर्मिती करता येईल असा कानमंत्रही त्यांनी नवख्या साहित्यिकांना दिला.
समाजप्रबोधन परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी जगातल्या धर्मपीठांनी मानवतेच्या विकसनात हातभार लावण्याऐवजी मोठे विघटन केले असल्याचे परखड मत मांडले. तसेच नव्या जगाचा धर्म ही कविता असेल असा आशावाद व्यक्त करताना डॉ. मनोहर म्हणाले, कसबे हे आंबेडकरी चळवळीतील एक वैचारिक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या साहित्याने आणि विचाराने एका पिढीचे प्रबोधन केले असून, त्यांनी अत्यंत खडतर वाटेवर चालत लेखनप्रवास केल्याचेही मनोहर यांनी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, नाटककार दत्ता पाटील, डॉ. मिलिंद कसबे, बी. जी. वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी कवी किशोर पाठक, महेंद्र मेश्राम, शं. क. कापडणीस, अंबादास घालगोत, प्रशांत गरुड, रंगराज ढेगले, आरती बोराडे, तुषार शिल्लक, प्रमोद अहिरे, संजय दोबाडे, मिलिंद बनसोडे, शैलेश चव्हाण, मेघा पाटील, कचरू भालेराव आदि उपस्थित होते. परिषद आयोजनासाठी दादा खरे, डॉ. सिद्धार्थ जगताप, चंद्रकांत गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: India was never tolerant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.