भारत योग यात्रा योगोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:46 AM2019-11-09T01:46:38+5:302019-11-09T01:47:08+5:30
देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल आॅफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.
नाशिक : देशातील पहिले योगविद्यापीठ अशी ख्याती असलेल्या बिहार स्कूल आॅफ योगाच्या भारत योग यात्रा योगोत्सवास शुक्रवारी (दि. ८) नाशिकमध्ये ठक्कर डोम येथे उत्साहात सुरुवात झाली. ‘स्वयम को जानो’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित योगोत्सवातील पहिल्याच सत्रात पाचशेहून अधिक साधकांनी सहभाग नोंदवत योगनिद्रा अनुभवली.
अनेक वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार या योग्यविद्येचा वापर कुठेही केल्याने उत्कृष्ट परतावे मिळत असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती स्वामी शिवानंद सरस्वती यांनी व्याख्यानातून दिली.
सत्राच्या प्रारंभी आचार्य कैवल्यानंद सरस्वती यांनी मन:शांती तसेच वैविध्यपूर्ण आसनांची माहिती देऊन प्रात्यक्षिक ांचे सादरीकरण केले. ओमकारच्या विविध छटा त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितल्या. पवनमुक्तासनाचे तीन टप्प्यात अध्ययन करून मार्गदर्शन केले. पुढे गायत्री मंत्र म्हणत तितली आसन करत त्याचे फायदे समजावून सांगितले. प्राणायामचाही अभ्यास योगाभ्यासकांकडून करून घेण्यात आला. दरम्यान, पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी सकाळी व संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेदरम्यान शास्त्रीय पध्दतीने योगासने, प्राणायाम, ‘स्वयम को जानो’ विषयावर प्रवचन आणि ध्यानसाधना असे कार्यक्रम होणार आहेत.
असाध्य रोगांवर नियंत्रण शक्य
योगनिद्रेच्या प्रभावाने अनेक असाध्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे स्वामी शिवराजानंद सरस्वती यांनी सांगितले. तसेच मानसशास्रीय आजार, निद्रानाश, तणाव, नाश आणणाऱ्या औषधांपासून मुक्ती मिळणे शक्य असून, सांधेदुखी, दमा, पेप्टिक अल्सर, कॅन्सर, हृदयरोग यासारख्या आजारांवरील संशोधनात योगनिद्रेपासून सकारात्मक परिणाम बघायला मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.