विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ
By admin | Published: September 17, 2015 12:04 AM2015-09-17T00:04:30+5:302015-09-17T00:04:30+5:30
हंसदेवाचार्य : जगन्नाथ मंदिरातर्फे साधू-महंतांचा सत्कार
पंचवटी : प्राणी व मानवाचे संरक्षण चीन, अमेरिका, जपान यांसारखे देश करू शकत नाही. प्राणी आणि मानवाचे संरक्षण फक्त भारत देश करतो म्हणूनच संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू हंसदेवाचार्य यांनी केले.
अहमदाबाद येथील जगन्नाथ मंदिराच्या वतीने साधुग्राममध्ये तीन अनि आखाडा व खालशाच्या महंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास होते. व्यासपीठावर निर्वाणीचे महंत धरमदास, निर्माेहीचे महंत राजेंद्रदास, चतु:संप्रदायचे बर्फानीदादा, बृजमोहनदास, रासबिहारीदास आदिंसह साधू-महंत उपस्थित होते. यावेळी बोलताना हंसदेवाचार्य यांनी सांगितले की, दोन सिंहस्थ पर्वण्या शांततेत पार पडल्या असून तिसरी पर्वणी शांततेत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.
महंत फुलडौलदास यांनी सर्वत्र चांगला संदेश देणारा देश म्हणून भारत असून भारतात कोणताही जातिभेद पाळला जात नाही असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन जगन्नाथ मंदिराचे प्रमुख महेंद्रभाई झा, महामण्डलेश्वर दिलीपदास महाराज यांनी केले होते.
कार्यक्रमाला रामकमलदास वेदांती, दिगंबरचे महंत कृष्णदास, महामंत्री वैष्णवदास, भक्तिचरणदास, नारायणदास, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त अशोक मोराळे, आडगाव पोलीस ठाण्याचे अनिल पवार आदिंसह तीन अनि आखाड्यांचे व खालशांचे साधू-महंत उपस्थित होते. महेंद्राभाई झा, महंत दिलीपदास यांच्या हस्ते साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला.