खुर्च्या कमी पडल्याने खासदारांची भारतीय बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:17 PM2019-06-04T16:17:39+5:302019-06-04T16:17:56+5:30
दुष्काळाचा आढावा : वीज वितरण कंपनीवर रोष व्यक्त
पेठ : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर शपथविधीचीही वाट न पाहता खासदार डॉ. भारती पवार यांनी दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला आहे. पेठ तालुक्यातील दुष्काळासंदर्भात बोलाविलेल्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसाठी खुर्च्या कमी पडल्याचे दिसताच पवार यांनी जमिनीवर भारतीय बैठक मारत कामकाज सुरू केले.
पेठ येथे तहसिल कार्यालयात पाणी टंचाईबरोबरच विविध समस्यांचे अंतरंग जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यात तिव्र पाणीटंचाई असलेल्या गांगोडबारी (धाब्याचा पाडा), वांगणी , जांभुळमाळ , उंबरपाडा, घुबडसाका,आमडोंगरा, बोरीचीबारी, अंबापूर, शिंगदरी आदी गावांमधील ग्रामस्थ, ग्रा.पं. सदस्य यांनी पाणी टंचाईबाबतची व्यथा मांडली. हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र एकच ध्यास घ्यावा लागत असल्याने जनजीवन विस्कळीत होत असल्याचे विदारक चित्र यावेळी दिसुन आले. मात्र बहुतांशी पाणीटंचाई ही मानवनिर्मित असल्याने प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना सुचवून कार्यवाही करावी, अशा सूचना खासदार पवार यांनी दिल्या . लघु पाटबंधारे( स्थानिक स्तर ) यांचे कार्यालय कायम कुलूपबंद असते. धरणातील पाण्याचा विसर्ग करतांना होणारी अनियमितता, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष यावर ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतला. लघुपाटबंधारे विभागाच्या अहवालात सुसुत्रता नसल्याने योजनांना मंजुरी कधी मिळाली? योजनेचा कालावधी, खर्च झालेला निधी याचा कुठलाही मेळ बसत नसल्याने पाणी टंचाई दूर करण्यातली अनास्था उघड झाली, वीज वीतरण कंपनीचे दिवसभर भारनियमन असल्याने महिलांना रात्री पाणी भरावे लागत असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशीराम वाघमारे , सदस्य विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, उपविभागीय अधिकारी संदीप आहेर , प्रभारी गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे , तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष पद्माकर कामडी , कांतिलाल राऊत, रामदास वाघेरे , संतोष् डोमे , रघुनाथ चौधरी , हेमंत कोरे , नामदेव चौधरी , छबीलदास चोरटे , निवृत्ती गालट, माधुरी गाडगीळ , शितल राहणे , जयश्री काळे, यांचेसह तालुक्यातील विभागप्रमुख, अधिकारी, सरपंच , ग्रामसेवक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते .