ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:49 PM2019-02-23T22:49:48+5:302019-02-24T00:00:11+5:30
ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाले असून, गावोगावी खाते उघडण्याचे काम पेपरलेस होऊ लागले आहे. विविध शासकीय योजनांच्या अनुदानासाठी राष्टयीकृत बॅँकेचा खाते क्रमांक लागतो.
सिन्नर : ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाले असून, गावोगावी खाते उघडण्याचे काम पेपरलेस होऊ लागले आहे. विविध शासकीय योजनांच्या अनुदानासाठी राष्टयीकृत बॅँकेचा खाते क्रमांक लागतो. त्यासाठी ग्रामीण जनतेची अडचण होत होती. आता मात्र ग्रामीण भागात इंडिया पोस्ट बॅँकेचे पदार्पण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इंडिया पोस्ट बॅँकेच्या खात्यातील विविध सुविधांमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवहार सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सध्या शासनस्तरावरील सर्वच अनुदान जवळपास डीबीटीच्या माध्यमातून वितरित केले जाते. ग्रामीण भागातील बँकेचे कमी प्रमाणात असलेल्या जाळ्यांमुळे ग्रामीण भागातील जनतेस बँकेत खाते उघडण्यापासून तर अनुदान प्राप्त होईपर्यंत तारेवरची कसरत करावी लागते. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली प्रधानमंत्री मातृत्ववंदन योजना गरोदर तसेच स्तनदा माता यांसाठी वरदान ठरत आहे. पोस्टाने नुकतेच बँकिंगमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून प्रवेश केला आहे. यात सिन्नर पोस्टाने चांगलीच आघाडी घेतली असून, एका आठवड्यात ६००हून अधिक खाती उघडली गेली आहेत.
गर्भवती महिलांस खाते उघडताना अडचण येऊ नये म्हणून सिन्नर तालुक्यातील पाच उपडाकघर तसेच ३० शाखा कार्यालयांमधून गर्भवती माता आपले पेमेंट बँकेमध्ये खाते उघडू शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडण्यासाठी फक्त आधार व मोबाइल क्रमांक असल्यास केवळ पाच मिनिटांत लाभार्थीचे खाते उघडले जाते. शून्य रुपयात हे खाते उघडता येते व सदर खाते पूर्णपणे पेपरलेस आहे.
असून, पासबुक म्हणून नेक्स्ट बँकिंग म्हणून ओळखल्या जाणारे क्विक रिस्पॉन्स कार्ड खातेधारकास देण्यात येते. खातेधारकास मोबाइल बँकिंग अॅपच्या माध्यमातून आरटीजीएस, एनइफिट, विमा भरणा, बिल पेमेंट्स, यूपीआय यांसारख्या सुविधा तसेच पोस्ट खातेधारक घरबसल्या अॅपच्या माध्यमातून आरडी, सुकन्या, पीपीएफ यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. पोस्टाचे कर्मचारी, अधिकारी यांनीदेखील यासाठी कंबर कसली असून, आपला आवडता पोस्टमन हा आता यापुढे मोबाइल व बायोमेट्रिकद्वारे खातेधारकाच्या घरी टपाल वितरण दरम्यान पोस्टाच्या बँकेचे खाते उघडण्यास येऊ शकतो. त्यानंतर १५५२९९ या टोल फ्री क्र मांकावर फोन केल्यास चक्क पोस्टमन खातेधारकाच्या घरी पैसे जमा करणे किंवा पैसे अदा करण्यास जाणार आहे. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी यांनी शासकीय अनुदान प्राप्त करण्यासाठी मोठ्या संख्येने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडण्याचे आवाहन सहायक अधीक्षक संदीप पाटील, सिन्नरचे पोस्टमास्तर आर. व्ही. परदेशी व अमोल गवांदे यांनी केले आहे.