इगतपुरीची युतीतील जागा बदलण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 01:50 AM2019-09-16T01:50:26+5:302019-09-16T01:50:48+5:30
निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधून आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज झालेल्या निर्मला गावित यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असून, त्यांच्या उमेदवारीस मोठा विरोध होत आहे. भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटप अजून नक्की झाले नसून, शिवसेनेच्या जागा यावेळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इगतपुरीमध्ये गावित यांना तिकीट देऊन निष्ठावंतांची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा हा मतदारसंघच भाजपला सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू झाल्याचे समजते.
नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर हाती शिवबंधन बांधून आमदारकीच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज झालेल्या निर्मला गावित यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते एकवटले असून, त्यांच्या उमेदवारीस मोठा विरोध होत आहे. भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटप अजून नक्की झाले नसून, शिवसेनेच्या जागा यावेळी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इगतपुरीमध्ये गावित यांना तिकीट देऊन निष्ठावंतांची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा हा मतदारसंघच भाजपला सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू झाल्याचे समजते.
इगतपुरी मतदारसंघामधून दोनवेळा कॉँग्रेसतर्फे आमदार झालेल्या निर्मला गावित यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढण्यासाठी त्या सिद्ध झाल्या; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या आकांक्षांना त्यामुळे पूर्णविराम मिळाला. या पार्श्वभूमीवर गावित यांच्या विरोधात शिवसेनेसह सर्वपक्षीय नेते एकत्र आले आणि त्यांनी एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. काही झाले तरी गावित यांना पराभूत करण्याचा या नेत्यांनी चंग बांधला असून, त्यासाठीची जुळवाजुळवही सुरू झाली आहे.
गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी आमदार शिवराम झोले, पांडुरंग गांगड, काशीनाथ मेंगाळ, विनायक माळेकर, संपतराव सकाळे, भाऊराव डगळे, हिरामण खोसकर यांच्या पुढाकाराने ठिकठिकाणी बैठका झाल्या आणि गावित यांच्या विरोधात एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावित यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेमधील अनेक नेते व कार्यकर्ते नाराज होणार असल्याची बाब लपून राहिलेली नाही. त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये फूट पडण्यापेक्षा ही जागाच मित्रपक्षाला देण्याबाबतचा विचार शिवसेनेच्या गोटातून पुढे आला आहे. राज्यात भाजप-सेना युती होणार असली तरी जागावाटप अद्याप नक्की झालेले नाही. त्यातच भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक जागा घेऊन सेनेला कमी जागा देण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे. त्यामुळे स्वपक्षीयांना नाराज न करता ही जागाच भाजपला देण्याबाबत मुंबईमध्ये विचार सुरू झाल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली. असे झाल्यास गावित यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच राहणार नाही.
वर्षानुवर्षं कॉँग्रेस पक्षाने ज्या घराण्याला सर्व काही दिले त्यांनी संधीसाधूपणा केल्याने कॉँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून, ते गावित यांना विरोध करण्यासाठी पेटून उठले आहेत. गावित यांच्यासोबत कार्यकर्ते शिवसेनेत गेले नसल्याचे स्पष्ट करीत सर्वपक्षीय नेतेही त्यांच्याविरोधात एक झालेले आजतरी दिसून येत आहे. त्यामुळेच हा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडल्यास ‘ना रहेगा बास, ना बजेगी बांसुरी’ अशी स्थिती होऊ शकेल, त्यामुळेच शिवसेनेमध्ये याबाबत खलबते सुरू झाली आहेत.
कविता राऊतचा पर्याय?
आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत हिला गावित यांच्या विरोधात मैदानात उतरविण्याचा प्रयत्न कॉँग्रेसने करून पाहिला; मात्र कविता राऊतकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यापाठोपाठ कविता राऊतने मुंबईमध्ये भाजप नेत्यांची भेट घेतल्याने ती भाजपकडून निवडणूक लढणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या गोटात सुरू असलेल्या खलबतांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमागे हेच कारण तर नसावे, अशी चर्चा आता जिल्ह्यामध्ये होऊ लागली आहे.