इंदिरा आवास घरकुलांसाठी पैशाची मागणी; ग्रामस्थांची तक्रार
By admin | Published: December 23, 2014 12:13 AM2014-12-23T00:13:04+5:302014-12-23T00:14:55+5:30
इंदिरा आवास घरकुलांसाठी पैशाची मागणी; ग्रामस्थांची तक्रार
नाशिक : पेठ तालुक्यातील शिवशेत आंबे येथील ग्रामस्थांकडून इंदिरा आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी चक्क पैशाची मागणी केल्याचा आरोप ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काल (दि.२२) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे केला. बनकर यांनी पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांना तत्काळ याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता इंदिरा आवास घरकुलांचा लाभ देण्यासाठीही पैशाची मागणी होत असल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. शिवशेत आंबे येथील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने सुखदेव बनकर यांना ही व्यथा कथन केली. ज्यांनी पाच हजारांप्रमाणे पैसे दिले, त्यांची नावे या इंदिरा आवासच्या घरकुल यादीत आली असून, ज्यांची नावे आलेली आहेत, त्यातील काही जण चक्क सरकारी व निमसरकारी सेवेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावचे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी या सर्वांवर या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने इंदिरा आवास घरकुल योजनेतून घर मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी याप्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला व पेठच्या गटविकास अधिकाऱ्यांना तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)