इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:31 AM2019-07-29T00:31:14+5:302019-07-29T00:31:34+5:30
पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर : पावसाळा असूनदेखील परिसरात पाणीकपातीच्या नावाने अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून पाणीपुरवठा विभाग वेठीस धरीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
गंगापूर धरणातील जलसाठा निम्मा असून, जुलै महिना संपत आला तरी अद्यापपर्यंत मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यापासून पाणीकपातच्या नावाने परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, जिल्हा परिषद, कॉलनी देवदत्त सोसायटी, देवेंद्र सोसायटी, शास्त्रीनगर, कमोदनगर एलआयसी कॉलनी, आदर्श सोसायटी आदीसह परिसरात गेल्या दहा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी भरले जात नाही, तर वापराचे पाणी आणायची कुठून? असा प्रश्न महिलावर्गाला पडला आहे. इंदिरानगर भागात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
नासर्डी ते पाथर्डी या परिसरात मुकणे धरणाचा पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाअभावी परिसरात कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याची तक्र ार करण्यात येत आहे. पाणीकपात, कमी दाबाने पाणीपुरवठा करणे का सुरू आहे. पाणीकपात म्हणजे काय याचा खुलासा महापालिकेने करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करून पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व व्हॉल्व्हमन नागरिकांना वेठीस धरीत आहे. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वेळा तक्र ार करूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
- रमाकांत अलई