इंदिरानगर सिटी उद्यान भकास
By Admin | Published: January 10, 2016 11:11 PM2016-01-10T23:11:05+5:302016-01-10T23:14:21+5:30
उद्यान विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांकडून संताप व्यक्त; देखभालीची मागणी
इंदिरानगर : सिटी उद्यानाची देखभालीअभावी भकास अवस्था झाली आहे. उद्यान विभागाच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगर परिसरात सहा वर्षांपूर्वी दोन एकर जागेत सिटी उद्यान साकारण्यात आले आहे. याठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यासाठी स्वतंत्र जागा, तसेच छोटेखानी कार्यक्रमासाठी अॅम्पीथिएटरही उभारण्यात आले. उद्यानाची आकर्षकता वाढविण्यासाठी परिसरात लॉन्ससह विविध प्रकारच्या शोभिवंत वृक्षांच्या रोपांची लागवडही करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा, तसेच दैनंदिन कामकाजात व्यस्त असणाऱ्यांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देताना फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. अशा विविध सोयीसुविधांनी युक्त सिटी उद्यानामुळे इंदिरानगरच्या सौैंदर्यात भरत पडली होती. त्यामुळे येथे विरंगुळा शोधण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसोबतच लहान मुलांना खेळण्यासाठी घेऊन येणाऱ्या पालकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र उद्यान विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा उद्यानाकडे येणारा ओघ ओसरू लागला आहे.
उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठ्या प्रमाणात गाजरगवतही वाढले आहे. उद्यानातील विद्युत रोषणाईत बिघाड झाला असून, काही विद्युत दिवे तुटलेल्या अवस्थेत आहेत. उद्यान परिसरात साचलेला कचरा व घाणीमुळे येथे येणाऱ्या लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उद्यानाची बकाल अवस्था झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)